Sun, Jul 21, 2019 00:21होमपेज › Sangli › शिक्षक बदल्यांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

शिक्षक बदल्यांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:17PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये त्रुटी आहेत.  पती-पत्नी एकत्रिकरण झालेले नाही.  सैनिक पत्नी, विधवा व परित्यक्तांची गैरसोय झाली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंंडे यांची भेट घेणार आहे,  अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. 

जिल्हा परिषदेत खासदार पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे उपस्थित होते. संवर्ग 1 व 2 अंतर्गत बदली अधिकारप्राप्त असलेल्या शिक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली झाली आहेत. गैरसोयीची बदली झालेले शिक्षक, शिक्षिका यावेळी उपस्थित होते. जिल्हांतर्गत बदल्या, आंतरजिल्हा बदलीद्वारे आलेल्या शिक्षकांना पदस्थापना आदेश यासंदर्भात चर्चा झाली. बदल्यांची सर्व प्रक्रिया राज्यस्तरावरून झाल्याने दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा होणार आहे. 

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षक अन्य जिल्ह्यात दहा-बारा वर्षे काम करत आहेत. संवर्ग 1 व 2 मधून त्यांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. मात्र इथे त्यांची अधिक गैरसोय झाली आहे. पती-पत्नी एकत्रिकरण झाले नाही. देशाच्या सीमेचे रक्षण करत असलेल्या सैनिकांच्या शिक्षक पत्नींचीही गैरसोयीची बदली झालेली आहे. बदल्यांमधील सर्व त्रुटीकडे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. 

शिक्षक भरती आवश्यक

जत, आटपाडी व अन्य तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरती तातडीने होणे आवश्यक आहे. त्याकडेही मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांचे लक्ष वेधले जाणार आहे, असे खासदार पाटील यांनी सांगितले. 

शिक्षक बदल्यांमधील या त्रुटी मुख्यमंत्र्यांसमोर

शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरण न होता त्यांच्या शाळांमधील अंतर वाढले आहे 
विस्थापित शिक्षकांना पसंतीक्रम देता आला नाही. रँडम राऊंडद्वारे गैरसोय. 
सैनिक पत्नींना सोयीची शाळा मिळण्याऐवजी  तालुक्याबाहेर  बदली झाली आहे 
आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना पसंतीक्रम देता आला नाही. 
त्यामुळे त्यांना मूळ तालुक्याबाहेरील गैरसोयीच्या शाळा मिळाल्या आहेत.