Tue, Jul 23, 2019 11:05होमपेज › Sangli › थकीत एलबीटीप्रश्‍नी व्यापार्‍यांचे आंदोलन

थकीत एलबीटीप्रश्‍नी व्यापार्‍यांचे आंदोलन

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

थकीत एलबीटी संदर्भात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील विविध व्यापारी संघटनांनी आज गुढीपाडव्याच्या दिवशीच आमदार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसनेत्या जयश्री  पाटील यांच्या घरी मोर्चा काढून धडक मारली.

आमदार गाडगीळ यांनी व्यापार्‍यांच्या प्रश्‍नासाठी आमदारकी पणाला लावेन. कोणत्याही स्थितीत व्यापार्‍यांचा प्रश्‍न सोडवला जाईल, असे आश्‍वासन दिले. जयश्री पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीत श्रीमती पाटील, महापौर हारुण शिकलगार आणि  सहभागृह  नेते किशोर जामदार यांनी करनिर्धारण रद्दचा ठराव महापालिकेच्या  महासभेत मंजूर करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

एलबीटी संदर्भात  व्यापारी एकता असोसिएशनचा नुकताच मेळावा झाला होता. त्यात दोन्ही नेत्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्यासह व्यापारी दुपारी जयश्री यांच्या घरी गेले.  त्यावेळी त्या ठिकाणी जयश्रीताई, महापौर शिकलगार, गटनेते जामदार, नगरसेवक संतोष पाटील, प्रशांत- पाटील मजलेकर आदी उपस्थित होते. 

समीर  शहा  म्हणाले,   एलबीटीच्या वादाबाबत  (स्व.) मदन पाटील यांनी मध्यस्थी करीत स्वयंनिर्धारणाद्वारे कर भरण्याचा तोडगा काढला होता. त्यानुसार तो करभरणाही आम्ही केला.  जे कर भरतील,  त्यांना पुन्हा त्रास होणार नाही, असे त्यांनी वचन दिले  होते.  पण त्याची अंमलबजावाणी झालेली नाही. उलट नोटिसा काढून आम्हाला त्रास दिला जात आहे. ज्या व्यापार्‍यांनी अभय योजनेत भाग घेऊन करभरणा केली आहे, त्यांच्या कर निर्धारणचा ठराव महासभेत रद्द करावा. 

त्यावर महापौर शिकलगार  आणि गटनेते जामदार म्हणाले, या संदर्भात प्रशासनाबरोबर  चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र आमचा ठराव झाल्यानंतर त्याला राज्य सरकारने मंजुरी द्यायला हवी. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. 

त्यानंतर तेथून व्यापारी आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी महापौर शिकलगारही आले. या ठिकाणी शहा  म्हणाले,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईस स्थगिती जाहीर केली. परंतु तीन महिने झाले तरी लेखी आदेश आले नाहीत. महापालिका अधिकारी त्याचे लेखी आदेश नाहीत, असे सांगत कारवाई  करीत आहेत. त्यामुळे आमच्यावरील कारवाईस मुख्यमंत्र्यांना सांगून स्थगिती मिळवावी.  महापालिकेने केलेल्या ठरावास शासनाकडून मंजुरी  देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यावर गाडगीळ यांनी तुमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदारकी पणाला लावेन, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रश्‍न सोडवला जाईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी  सुरेश पटेल, सोनेश बाफना, मुकेश चावला, सुदर्शन माने, धीरेन शहा व व्यापारी उपस्थित होते.