Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Sangli › बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ

बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : गणेश कांबळे

जागेचे आणि  उपसाबंदीमुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. वाढती महागाई, कामातील मंदी, नोटबंदी या सर्व दुष्टचक्रात जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाला ‘घर घर’ सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायम कामाची हमी नाही. किमान वेतन कायद्याचे संरक्षण नाही. या सर्व कारणांमुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

सांगली, मिरज परिसरात कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कामाच्या शोधात आलेला वर्ग आणि जवळ असलेल्या कर्नाटकातून बहुसंख्य कामगार वर्ग गेल्या 40 ते 50 वर्षांपासून या ठिकाणी येऊन स्थायिक झालेला आहे. हे कामगार गिलावा, बांधकाम, सेंट्रिंगतसेच फर्निचर बनविणे, पाया खोदाई, वीटभट्टी आणि रस्ते तयार करण्याची कामे करीत आहेत. या कामात कर्नाटकातून आलेले आणि या भागात स्थायिक झालेल्या कामगारांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानमधून स्थलांतरीत झालेले कामगार विशेषत: गिलावामधील कलाकुसर करणे, रंगकाम, फरशी फिटिंग करणे आदि कामे करतात. हे कामगार या ठिकाणी कायमस्वरुपी स्थायिक नसले तरी परिसरातील गुंठेवारी परिसरात, झोपडपट्ट्यांमध्ये भाड्याने घरे घेऊन राहतात.

दहा वर्षांपूर्वी या परिसरात जमिनीचे दर कमी होते. बांधकाम साहित्याच्या किंमतीही स्वस्त होत्या. त्यामुळे शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे कामगारांना महिन्यातून  20 ते 25 दिवस काम असायचे. आठवड्याला पगार असायचा. रविवारची सुटी मिळायची. त्यामुळे बांधकाम कामगाराला चांगले दिवस होते. परंतु गेल्या काही वषार्ंत मात्र बांधकाम व्यवसायात स्पर्धा वाढलेली आहे. त्याचबरोबर वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. पूर्वी वाळूचा एका ब्रासचा दर हा 4 हजार रुपये सर्वाधिक होता. परंतु सध्या हा दर 12 ते 15 हजार रुपये ब्रास झालेला आहे. त्यामुळे मध्यम व नोकरदार वर्गाकडून घर बांधणीचा वेग कमी झाला. जमिनीचे दर वाढल्यामुळे फ्लॅटच्या किंमतीही वाढल्या आहेत. एक लाख रुपये गुंठा असणार्‍या जमिनीच्या किंमती पाच लाखापर्यंत गेल्या. त्यामुळे जमीन खरेदी करून घर बांधणे कमी झाले आहे. त्याचा  बांधकाम कामगारांवर उपासमारीची परिणामही कामगारांच्या कामावर झालेला आहे. 

अत्याधुनिक यंत्रांचा फटका कामगारांना

शहरातील तसेच जिल्ह्यात रस्त्याची कामे असायची. खडीकरण आणि डांबरीकरण कामे दरवर्षी ठरलेली असायची. परंतु आता ही कामे अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून करण्यात येत आहेत. पूर्वी ही कामे करण्यासाठी सुरुवातीला रस्ता झाडून काढणे, त्यावर खडी पसरणे, रोलर फिरवणे, डांबरीकरण करणे ही कामे कामगारांकडून केली जात होती. हजारो कामगार यामध्ये काम करीत होते. परंतु या कामासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जातात. रस्ता झाडून काढण्यापासून खडीकरण, डांबरीकरण ही कामे यंत्राद्वारे काही दिवसातच पूर्ण केली जातात. त्यामुळे या ठिकाणी कामगारांची गरज लागत नाही. तसेच गटर कामाची खोदाई, बांधकामासाठी पाया काढणे, पाईल मारणे ही कामे सुध्दा मजुरांकरवी केली जायची. परंतु आता यंत्राद्वारे ही कामे केली जातात. त्याचाही परिणाम मजुरांच्या कामावर झाल्याचे कामगारांनी सांगितले. 

कामगारांना संरक्षण नाही 

बांधकाम कामगार संघटना फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. शंकर पुजारी म्हणाले, आपल्याकडील बांधकाम हा हंगामी आहे. पावसाळ्यात कामे पूर्णपणे ठप्प असतात. नोटाबंदीचा बांधकाम व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे रोखीने होणारे व्यवहार थांबलेले आहेत. त्यामुळे घर बांधणीच बंद आहे. त्यामुळे कामगारांना महिन्यातून 10 ते 15 दिवसच काम असते. किमान वेतन कायद्यानुसार कुशल, अकुशल कामगारांना वेतन दिले जात नाही. या कामगारांना धोकादायकस्थितीत काम करावे लागते. त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही.अनेक कामगार काम करीत असताना पडून जखमी झालेले आहेत. त्यातील काही अपंग झालेले आहेत. त्यांना शासनाकडून वा संबंधित ठेकेदारांकडून भरपाई दिली जात नाही. सिमेंट व डांबरामध्ये काम करणार्‍या कामगारांना गमबूट, हातमोजे, हेल्मेट पुरविले जात नाहीत.  सिमेंटमुळे हाताला भसके पडतात. न बरे होणारे त्वचा रोग त्यांना होतात. बांधकाम कामगारांच्या विधवांना तातडीने 2 लाख रुपये द्यावे, असा शासनाचा आदेश आहे. 

महाराष्ट्रात 500 कामगार मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यांच्या विधवांना शासनाने अद्याप पैसे दिलेले नाहीत. शासन बिल्डर व ठेकेदारांकडून 1 टक्का उपकर जमा करते, परंतु ते खर्च करीत नाही. बांधकाम कामगारांची नोंदणीच नसल्याने त्यांच्या नावावर इएसआय, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युअटी, पेन्शन अशा सुुविधांपासून कामगार वंचित आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

काम नसल्याने कामगारांमध्ये व्यसनाधिनता

पूर्वी महिन्यातून 20 ते 25 दिवस काम असायचे. परंतु काम नसल्याने कामगारांमध्ये नैराश्य येत आहे. त्याचा परिणाम म्हणून कामगार व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर होताना दिसत आहे. दारूसारख्या व्यसनामध्ये बहुसंख्य कामगार गुरफटलेले असल्याचे चित्र आहे.

Tags : Sangli, Sangli News, Time,  hunger,  construction workers


  •