होमपेज › Sangli › सह्याद्रीत घुमणार वाघांची डरकाळी

सह्याद्रीत घुमणार वाघांची डरकाळी

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 9:47PMवारणावती : आष्पाक आत्तार

ताडोबा अभयारण्यामधील काही वाघ चांदोलीत नेण्याबाबतच्या  सुचनेला वनखात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे वाघांची डरकाळी आता सह्याद्रीत घुमणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र या वाघांच्या संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे मंजूर असूनही गेल्या पाच वषार्ंपासून  कार्यरत नाही. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतरण झाल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

पाच वर्षांपूर्वी चांदोली व कोयना अभयारण्यातील वाघांचे अस्तित्व लक्षात घेऊन शासनाने 690.63 चौरस किलोमीटर क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले. मात्र येथे वाघांचे अस्तित्व नसल्यामुळे पर्यटक इकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ताडोबा अभयारण्यामधील वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यटक तिकडे गर्दी करतात. पर्यटकांनी चांदोलीलाही पसंती द्यावी, यासाठी  पर्यटन व वनविभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी ताडोबामधील काही वाघ चांदोलीत आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

मात्र या वाघांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स मंजूर असूनही कार्यरत नाही चार वषार्ंपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. मेळघाट येथे तात्काळ तो कार्यरतही झाला. मात्र सह्याद्रीत  तो अद्याप कार्यरत नाही. या फोर्समध्ये 120 प्रशिक्षित वन कर्मचारी असतात. या फोर्समुळे वन्यजीव विभागाकडे कर्मचार्‍यांची संख्या वाढून प्रकल्प क्षेत्रातील वाघासह इतर प्राण्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. 

सह्याद्रीत ही फोर्स कार्यरत नसल्यामुळे कर्मचार्‍यांवर त्याचा ताण पडून  वाघांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार  आहे. त्यामुळे वाघांच्या स्थलांतराबरोबरच मंजूर असणारी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे तात्काळ कार्यरत करण्याची गरज आहे.