Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Sangli › जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गारांचा पाऊस

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गारांचा पाऊस

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 11:47PMसांगली : प्रतिनिधी 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मंगळवारी सायंकाळी वादळीवारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला.  पूर्व भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तासगाव तालुक्यात मात्र चांगला पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी घरांचे व पिकांचे नुकसान झाले. हा पाऊस शेतीच्या पूर्व मशागतीसाठी उपयुक्‍त ठरणार आहे.

आज सकाळपासूनच हवेत मोठा उकाडा होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगांची दाटी झाली. वादळीवारे व विजांचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शिराळा तालुक्यातील कोकरूड, चिंचोली, बिळाशी परिसरात दीड तास गारांचा पाऊस पडला. 

इस्लामपूर शहरात यल्लमा चौकात झाड पडले. वाहतूक ठप्प झाली. नेर्ले, कासेगाव, बहे, बोरगाव, साखराळे, आष्टा, बागणी, शिगाव, तांदुळवाडी व अन्य गावांना अर्धा तास पावसाने धुवून काढले. पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूर,  धनगाव, अंकलखोप, माळवाडी, पलूस, बांबवडे, कुंडल या ठिकाणी सोसाट्याच्या 

वार्‍यासह पाऊण तास पाऊस पडला. कडेगाव तालुक्यात पावसाच्या किरकोळ सरी पडल्या.मिरज तालुक्यात हवेत केवळ गारवा होता. काही ठिकाणी वरुण राजाने हजेरी लावली. 

तासगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. शहरासह तालुक्याच्या पूर्वेकडील सावळज भाग व  उत्तरेकडील आणि पश्चिम भागात पाऊस चांगलाच बरसला. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून विजेच्या तारेवर पडल्या. या पावसाचा फायदा द्राक्ष बागांच्या खरड छाटणीसाठी होणार आहे. 

खानापूर तालुक्यात लेंगरे परिसरात गारपीट झाली. भाजीपाला पिकांना याचा फटका बसला. जोरदार वार्‍यामुळे खानापूर पोलिस औट पोस्टच्या इमारतीवर झाड पडले. विटा शहरात  हलक्या सरी पडल्या. घाटमाथ्यावरील भिवघाट, पळशी, रेणापूर, बलवडीत वादळी वार्‍यासह पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले. आंब्याचे मोठे नुकसान झाले. 

कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात किरकोळ पाऊस झाला. जत तालुक्यातील शेगाव, सनमडी, कोसारी, कुंभारी, आवढी यासह लगतच्या परिसरात अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

Tags : Thunder rain ,western part , district sangli news