Tue, May 21, 2019 18:22होमपेज › Sangli › कडेगाव पूर्वभागात चोरट्यांचा धुमाकूळ    

कडेगाव पूर्वभागात चोरट्यांचा धुमाकूळ    

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:22PMकडेगाव : संदीप पाटील 

कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोरटे चीजवस्तू तर पळवित आहेतच, परंतु त्यांच्याकडून होत असलेल्या मारहाणीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चोरट्यांकडून दिवसा  गावागावांतील माहिती घेतली जात असावी. नंतर  पाळत ठेवून  आसपासच्या ठिकाणांची माहिती घेऊन रात्री  चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सध्या ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचे दिवस आहेत. शाळांना सुटी आहे.  त्यामुळे बहुसंख्य गावांतील लोक  पै-पाहुण्यांकडे जात आहेत.  अशा बंद असलेल्या  घरांचा शोध घेऊन रात्री त्या ठिकाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उकाड्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात बहुसंख्य ग्रामस्थ  अंगणात झोपी गेलेले असतात. दिवसा विजेअभावी पंप बंद असतात.  रात्री- अपरात्री वीज  कधीही येते. त्यामुळे घरातील  प्रमुख व्यक्‍ती शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी जात असतात. याचा फायदा घेत  आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे चोर्‍या करीत आहेत.

सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, संसारोयोगी साहित्य व पैसे लंपास केले जात आहेत. चोरीच्या वेळी घरातील कोणी जागे झाले आणि त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला तर चोरट्यांकडून  त्यांना  मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सध्या  ग्रामीण भागात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकतेच सोनसळ (ता.कडेगाव) येथील एक महिला जनावरे चारण्यासाठी डोंगराकडे गेली होती. त्यावेळी आलेल्या चोरट्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करीत  त्या महिलेचे सोन्याचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेला मारहाण करीत चोरट्यांनी तेथून पळ काढला.

असाच  शिवणीमध्ये नुकताच एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घरफोड्यांत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे, मोबाईल व संसारोपयोगी साहित्य लुटण्याचा प्रयत्न केला. त्या घरातील महिला-पुरूषांना मारहाण करण्याचा प्रकार घडला.चोरट्यांच्या या  दहशतीमुळे तालुक्यातील शिवणी, अमरापूर, चिखली, येवलेवाडी, आंबेगाव यासह अन्य गावा-गावांत सध्या भीतीचे व चिंतेचे वातावरण  आहे. 

गावा-गावांत गस्त सुरू                     

वाढत्या चोर्‍यांमुळे सध्या  बहुसंख्य गावांत ग्रामस्थ, तरूण मंडळे , ग्रामसुरक्षा   दल   यांच्याकडून खबरदारी म्हणून रात्रीची गस्त  सुरू झाली  आहे. पूर्वी रात्री  गुरख्यांची नेमणूक केली जात असे. परंतु अलिकडे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तरूण मित्र -मंडळांचे कार्यकर्ते यांच्याकडून रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे काम सुरू झाले आहे.