होमपेज › Sangli › तीन संशयित दरोडेखोर जेरबंद

तीन संशयित दरोडेखोर जेरबंद

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:08AMजत/ येळवी : प्रतिनिधी/ वार्ताहर

तालुक्यातील खैराव येथे घरावर दरोडा टाकणार्‍या संशयित तिघांचा थरारक पाठलाग करून ग्रामस्थांनीच त्यांना जेरबंद केले. त्यांना बेदम चोप देऊन जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयित दरोडेखोरांपैकी दोघांनी मात्र पलायन केले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात लोकांच्या सतर्कतेमुळे तालुक्यात सहा दरोडेखोर पकडण्यात आले आहेत. 

प्रकाश शिवाजी चव्हाण (वय 28, रा. इंदिरानगर, जत), बादल बाळू शिंदे (वय 23, रा. खडकी, ता. मंगळवेढा) अशी संशयितांची नावे आहेत. तिघांपैकी एकजण  अल्पवयीन मुलगा आहे. त्यांचे दोन साथीदार पळून गेले. त्या सर्वांवर जत पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तीन चाकू, मोटारसायकल ( एमएच-10 5762)जप्‍त करण्यात आली आहे.खैराव येथील रामचंद्र विठ्ठल पाटील यांनी जत पोलिसांत तक्रार दिली आहे. दरोडेखोरांची पाचजणांची टोळी मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या वाड्यात शिरली. मुख्य दरवाजाची कडी मोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्या आवाजाने पाटील यांना जाग आली. त्यांनी गावातील काही लोकांना फोनवरून माहिती दिली. 

पाटील यांच्या घरात घुसून चोरी करणार्‍यांना पाटील यांनी अटकाव केला. त्यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्‍ला केला. पाटील यांनी वार चुकविला. याचवेळी  अनेक ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांनी वाड्याला गराडा घातला. लोक जमा झाले असल्याचे लक्षात येताच दोघेजण पळून गेल. तिघाजणांना  मात्र ग्रामस्थांनी धाडसाने पकडले. त्यांचे हातपाय बांधून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले.  ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला.  घटनेची माहिती दिल्यानंतर जतचे पोलिस पथक तातडीने दाखल झाले. दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरीत वापरलेली हत्यारे, मोटारसायकलही जप्‍त केली. त्यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.खैराव, येळवी, टोणेवाडी परिसरात चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ दक्ष झाले आहेत.चार दिवसांपूर्वी जत शहरातही तीन संशयित दरोडेखोरांना नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.