Sun, May 26, 2019 01:08होमपेज › Sangli › बाजार समितीच्या ३ उपसमिती सभापतींचे राजीनामे

बाजार समितीच्या ३ उपसमिती सभापतींचे राजीनामे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमन उपसमितीचे नुतन सभापती अजित बनसोडे, प्रतवारी उपसमितीचे सभापती मुजीर जांभळीकर व सांगली जनावरे दुय्यम बाजार आवार उपसमितीचे सभापती शितल पाटील यांनी सभापतीपदाचे तसेच उपसमितींमधील सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. संचालक बाळासाहेब बंडगर ‘मिरज’ व ‘प्रचार’ उपसमितीतून बाहेर पडले आहेत. 

बाजार समितीच्या 12 उपसमित्यांवरील सभापती, सदस्य निवडी सोमवारी संचालक मंडळ बैठकीत जाहीर झाल्या. मात्र अपेक्षित उपसमिती न मिळाल्याने काही संचालकांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. 

दादासाहेब कोळेकर ‘दुबार’; अजित बनसोडेंचा ‘आपटबार’

कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार उपसमितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे अजित बनसोडे प्रबळ इच्छुक होते. भाजपचे खासदार संजय पाटील समर्थक दादासाहेब कोळेकर हे सलग दुसर्‍यांदा निवडीसाठी आग्रही होते. कोळेकर यांना दुबार संधी मिळताच, बनसोडे यांच्या ‘आपटबार’चा आवाज घुमला. बनसोडे यांची नियमन उपसमितीच्या सभापतीपदी निवड झाली होती. त्यांनी या उपसमितीचा राजीनामा दिला आहे.

जांभळीकर, बंडगर होते नाराज

प्रतवारी उपसमितीचे सभापती मुजीर जांभळीकर, सांगली जनावरे बाजार आवार उपसमितीचे सभापती शितल पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. ते व्यापारी प्रतिनिधी संचालक आहेत. बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीच्या घडामोडींवेळी या दोन संचालकांना तसेच हमाल प्रतिनिधी संचालक बाळासाहेब बंडगर यांना दूर ठेवले होते. हळद जीएसटी प्रश्‍नी झालेल्या चर्चांना जांभळीकर हजर नसत. बाजार समितीनेही त्यांना ‘विशेष निमंत्रण’ दिले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. संधी आल्यानंतर त्यांनी राजीनामे देऊन नाराजी दर्शविली. बाळासाहेब बंडगर हे फळे व भाजीपाला उपसमिती सभापतीपदासाठी इच्छुक होते. त्यांचा विचार झाला नाही. त्यांनी मिरज दुय्यम बाजार आवार व प्रचार उपसमितीमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

संती नाराज; पण राजीनामा नाही

माजी उपसभापती रामगोंडा संती हे जत दुय्यम बाजार आवार उपसमिती सभापतीपदासाठी इच्छूक होते. पण दयगोंडा बिरादार यांनी बाजी मारली. त्यामुळे ते नाराज होते. पदाधिकारी दूरध्वनीही घेत नसल्याचे सांगत नाराज आहे, पण उपसमिती सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. संती हे जत, कवठेमहांकाळ तसेच फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार उपसमितीचे सदस्य आहेत. 

 

Tags : sangli, sangli news,  Sangli Agricultural Produce Market Committee, chairmen, resigned,


  •