Fri, Apr 19, 2019 12:38होमपेज › Sangli › तासगाव फाट्यावर अपघातात तीन गंभीर जखमी 

तासगाव फाट्यावर अपघातात तीन गंभीर जखमी 

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:26PMमालगाव : वार्ताहर

मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाटा येथे बुधवारी पहाटे चार वाजता सिमेंट कंटेनर व डाळ वाहतूक करणारा ट्रक यांचा  अपघात झाला. अपघातात   तीन जण गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दोन्ही वाहनांच्या  चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.   कंटेनर चालक  शरणाप्पा चंद्रकांत नाटेकर (वय 27, रा.चन्नूर, ता.शहापूर, जि. यतगीर), ट्रकचालक अविनाश श्रीशैल कलशेट्टी (वय 28) व श्रीशैल श्रीमंत कलशेट्टी (वय 48,  रा. नांदगाव,  ता. तुळजापूर,  जि. उस्मानाबाद, सध्या सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. 

सोलापूरहून मिरजेकडे जाणारा ट्रक (एमएच 13 आर 2672)  आणि विजापूर येथून सुभाषनगर (मालगाव) मार्गे एमआयडीसीकडे जाणारा सिमेंट कंटेनर (केए 32 सी 9444) यांची जोरदार धडक झाली. अपघाताचा जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील रहिवासी  तातडीने घटनास्थळी गेले.  अपघातानंतर परिरसरातील युवकांनी जखमींना तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही ग्रामस्थांनी मात्र सिमेंट व डाळीची पोती पळवून नेली. दरम्यान, या चौकात गेल्या  दोन महिन्यातील हा दुसरा भीषण अपघात  आहे.तासगाव फाटा व माने मळा स्टॉप येथे सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन याठिकाणी कळंबी रस्त्याप्रमाणे गतीरोधक  बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या  चौकात प्रवाशांना उभे राहण्यासाठी  पिकअप शेड उभारण्याची मागणी  आहे.  याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा तानंगचे उप सरपंच विकास कदम यांनी दिला आहे.