Mon, Aug 26, 2019 00:11होमपेज › Sangli › डंपरने कारला चिरडले; तीन ठार

डंपरने कारला चिरडले; तीन ठार

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:29PMविटा : वार्ताहर 

भरधाव डंपरने कारला चिरडल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना माहुली (ता. खानापूर) येथील बसथांब्याजवळ सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 

याबाबत विटा पोलिसांत नंदकुमार माने यांनी वर्दी दिली आहे. सुरेश किसन देवकाते (वय 45), सुनंदा किसन देवकाते (वय 67), बबलू ऊर्फ यश सुरेश देवकाते (वय 6, सर्व रा. जेजुरी, जि. पुणे, मूळ रा. जत) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुरेश देवकाते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी जयसिंगपूरकडे कारमधून (एम.एच. 20 एच.1132)  आई सुनंदा, मुलगा बबलू, पत्नी शोभा आणि बहीण स्नेहलता किसन देवकाते यांच्यासह निघाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माहुली येथील बसथांब्यावर समोरून भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने (एम.एच.10 ए. डब्लू 8195) देवकाते यांच्या चारचाकी गाडीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की देवकाते यांची चारचाकी गाडी 30 फूट फरफटत गेली. 

यात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक सुरेश देवकाते, त्यांचा मुलगा बबलू आणि आई सुनंदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या पत्नी शोभा, मुलगी सई आणि बहीण स्नेहलता या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक धनाजीराव पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांची उत्तरीय तपासणी करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

वाळूच्या डंपरचा अपघात झाल्याचे समजताच विटा आणि परिसरातील वाळू तस्करांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वास्तविक या रस्त्यावरील खड्डे आणि खचलेल्या साईडपट्ट्या यामुळेच अपघाताची घटना झाल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत होती. याबाबत विटा पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालक फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.