Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Sangli › विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इटकरे/कुरळप : वार्ताहर

शेतात तुटून पडलेल्या विद्युतवाहिन्यांचा धक्‍का बसून वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये माय-लेकरासह मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर यावेळी सुदैवाने दोघांचा प्राण वाचला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. प्रभाकर लक्ष्मण महाडिक (वय 35), छाया लक्ष्मण महाडिक (55, दोघे रा. येलूर), प्रकाश भीमाण्णा मगदूम (51, रा. मेंडीगिरी, ता. जत) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रकाश महाडिक व रत्नमाला महाडिक अशी या घटनेतून बचावलेल्यांची नावे आहेत. 

या घटनेमुळे येलूर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमधून महावितरणच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. येलूर गाव बंद ठेवून या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला. गेल्या दोन वर्षात महावितरणच्या गलथान कारभारामुळे या परिसरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येलूरचे माजी सरपंच जे. टी. महाडिक यांच्याकडे काम करणारा मजूर प्रकाश मगदूम हा शनिवारी पहाटे गावाच्या पश्‍चिमेस असलेल्या शेतात पाणी पाजण्यास गेला होता. उसाच्या शेतात विजेच्या तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होताच विजेच्या धक्क्याने मगदूम याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने प्रभाकर महाडिक व त्यांची आई छाया महाडिक हे दोघे पाणी पाजण्यासाठी शेतात निघाले होते. त्यांचाही याच विद्युततारेेचा धक्‍का बसून जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, प्रकाश मगदूम हा शेतातून परत का आला नाही म्हणून जे. टी. महाडिक यांच्या स्नुषा रत्नमाला महाडिक पहाटे 6 वा.च्या सुमारास त्याला  फोनवरून संपर्क साधण्याचा 
प्रयत्न करत होत्या. मात्र फोन उचलत नसल्याने त्या शेताच्या दिशेने त्याला शोधण्यासाठी गेल्या. त्यावेळी मगदूमच्या फोनवर रिंग वाजत होती. तेथून निघालेल्या प्रकाश महाडिक यांना मोबाईलची रिंग ऐकू आली. त्या आवाजाच्या दिशेने ते गेले  असता त्या तिघाजणांचा मृतदेह त्यांना आढळून आला. 
दोघांचे सुदैव...

प्रकाश मगदूम यांच्या खिशात मोबाईल वाजत होता. प्रकाश महाडिक  यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने सुदैवाने ते सावध झाले व त्या तारेपासून ते दूर झाल्याने बचावले. काही वेळातच रत्नमाला या शेतामध्ये मगदूम यांना शोधण्यासाठी आल्या. त्यांचाही त्या तारेला स्पर्श होणार एवढ्यात प्रकाश महाडिक यांनी आरडा-ओरडा केल्याने रत्नमाला यांनी तारेवरून पलीकडे उडी मारली. त्यामुळे त्यादेखील बचावल्या. 

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. या घटनेत माय-लेकरांसह मजुराचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने नागरिकांच्यात महावितरणच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरकारभाराबद्दल असंतोष पसरला आहे. 

या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहांचे कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांच्याकडे मृतदेह ताब्यात देण्यात आले. दुपारी  मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर महाडिक हा पेठ येथील महाडिक पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये नोकरीस होता. तो सकाळी गावातील विजयसिंह गायकवाड दूध संस्थेत काम करत होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, सहा वर्षाची लहान मुलगी असा परिवार आहे. 

Tags : sangli, sangli news, Three people die, electric shock,


  •