Fri, Apr 26, 2019 00:12होमपेज › Sangli › सांगली एलसीबीची अशीही ‘हॅट्रिक’

सांगली एलसीबीची अशीही ‘हॅट्रिक’

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 9:02PM

बुकमार्क करा

सांगली : अभिजीत बसुगडे 

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांचे अपहरण करून खून केल्याच्या संशयावरून पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांना अटक करण्यात आली. त्यांनी सांगली एलसीबीत काम केले होते. त्यापूर्वी तत्कालीन सहाय्यक निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर विश्‍वनाथ घनवट यांना वारणानगर येथील 9 कोटींच्या दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सांगली एलसीबीत काम करणारे अधिकारी गुन्ह्यांत अडकल्याची ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे सांगली एलसीबीची चर्चा जोरदार सुरू आहे. 

सन 2011-12 मध्ये तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याकडे सांगली एलसीबीचा कार्यभार होता. सांगलीत नियुक्तीला असताना कदम यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर त्यांना निरीक्षकपदी पदोन्नतीही मिळाली. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. 

कदम यांनी सांगली एलसीबीचा कार्यभार निरीक्षक अभय कुरूंदकर यांच्याकडे सोपविला. त्यानंतरच त्यांच्याकडे असणार्‍या महिला कक्षात अश्‍विनी बिंद्रे-गोरे उपनिरीक्षक होत्या. तेथेच त्यांची ओळख झाली होती. बिंद्रे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याच्या संशयावरून कुरूंदकर यांना नुकतीच मुंबईत अटक करण्यात आली आहे. कुरूंदकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर विश्‍वनाथ घनवट यांच्याकडे त्यांनी  कार्यभार स्वीकारला. 

घनवट यांनी कार्यभार घेतल्यानंतर दोन वर्षे त्यांनी एलसीबीत काम केले. त्यानंतर त्यांची बदली गुंडा विरोधी पथकाकडे करण्यात आली. गतवर्षी मार्चमध्ये  मिरजेतील बेथेलहेमनगर येथे  चोरीची तीन  कोटींची रोकड  त्यांनी व त्यांच्या पथकाने जप्त केली होती. याप्रकरणात वारणानगर येथे तपासाला गेल्यानंतर  तेथील 9 कोटींची रोकड चोरल्याच्या गुन्ह्यात त्यांच्यासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

सांगली एलसीबीकडे   काम करणारे सलग तीन अधिकारी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकल्याचे कुरूंदकर यांच्या अटकेनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे सांगली एलसीबीत  काम करण्यास अधिकारी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच पदावर सलग काम करणारे तीन अधिकारी गुन्ह्यांत अडकल्याने या प्रकरणाची सध्या तरी जोरदार चर्चा सुरू आहे.