होमपेज › Sangli › ‘महिला-बालविकास’चे तीन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

‘महिला-बालविकास’चे तीन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकार्‍यासह जिल्हा परिविक्षा अधिकारी, बाल संरक्षण अधिकारी अशा तिघांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

संदीप दौलतराव मोहिते (वय 55, रा. गारगोटी, जि. कोल्हापूर), विनोद नारायण चौगुले (45, रा. पाचगाव, जि. कोल्हापूर), राजेंद्र बाळकृष्ण भाट (50, रा. हरिपूर रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहिते कोल्हापूरचे जिल्हा व महिला-बालविकास अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सांगलीचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. तर चौगुले जिल्हा परिविक्षा अधिकारी असून, भाट बाल संरक्षण 
अधिकारीपदावर कार्यरत आहेत.

यातील तक्रारदार महिला व बालविकास कार्यालयाकडे कंत्राटी पद्धतीवर कायदा अधिकारीपदावर कार्यरत आहेत. त्यांचा अकरा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक दिवस तांत्रिक खंड देऊन पुनर्नियुक्‍ती देऊन पुन्हा कामावर हजर करून घेण्यासाठी मोहिते आणि चौगुले यांनी त्यांच्यासह अन्य दोघांकडे मिळून 45 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा चौगुले आणि मोहिते यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणीही केली.

त्यानंतर मंगळवारी दुपारी विभागाने येथील महिला व बालविकास कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी बाल संरक्षण अधिकारी भाट, परिविक्षा अधिकारी चौगुले यांनी मोहिते यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याचवेळी कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोहिते यांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले. तिघांनाही सांगलीतील कार्यालयात आणण्यात आले असून, बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags : sangli ,sangli news, Three officers, Women and Child Development, caught, bribe