Fri, Jul 19, 2019 16:35होमपेज › Sangli › पैसे वाटप करताना तिघे ताब्यात

पैसे वाटप करताना तिघे ताब्यात

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:29PMसांगली : प्रतिनिधी

डमी इव्हीएम यंत्र तयार करून त्याद्वारे मतदारांना माहिती देताना तसेच पैसे वाटप करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये एका उमेदवाराच्या पतीचा समावेश आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात तिघांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून डमी इव्हीएम मशीन, 33 हजार 400 रूपये रोख, दोन मोबाईल, टेम्पो असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. 

रमेश सर्जे, राहुल भरत बुरूड (वय 29, रा. रेपे प्लॉट), संदीप कानिफनाथ साळे (वय 28, रेपे प्लॉट) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सर्जे यांची पत्नी नीता तसेच सुरेश आटपाडे, सुनीता पाटील, शीतल पाटील हे उमेदवार परिवर्तन विकास पॅनेलकडून निवडणूक लढवत आहेत. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास तिघे संशयित एका टेम्पोमध्ये (एमएच 10 बीआर 8882) बसून डमी इव्हीएम मशीनद्वारे मतदारांना आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याची माहिती देत होते. 

मतदानाची माहिती देताना ते माहितीपत्रकासह प्रति मतदार एक हजार रूपये वाटत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. निरीक्षक शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पैसे वाटप करताना तिघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याकडू डमी इव्हीएम मशीनसह रोकड, टेम्पो, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय तिघांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत. 

इव्हीएमसह फोटो, दोघेजण ताब्यात

सांगलीवाडी येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील मतदान केंद्रामध्ये मतदान करताना इव्हीएम मशीनसह फोटो काढल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. चेतन सचिदानंद कदम (वय 25, रा. कदम प्लॉट, सांगलीवाडी), सुभाष दत्तात्रय जाधव (वय 27, रा. चव्हाण प्लॉट, सांगलीवाडी) अशी त्यांची नावे आहेत. चेतन कदम सव्वाएकच्या सुमारास तर सुभाष जाधव दोनच्यासुमारास मतदानासाठी गेला होता. त्यावेळी मतदान करताना दोघांनीही इव्हीएम मशीनसोबत मोबाईलवर फोटो काढला. त्यामुळे दोघांनाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. मशीनसह फोटो काढून गुप्त मतदान पद्धतीचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.