Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Sangli › वारणा कालव्यांसाठी तीनशे कोटी

वारणा कालव्यांसाठी तीनशे कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिराळा : प्रतिनिधी

वारणा प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जवळपास तीनशे कोटींची गरज असून हा निधी दोन टप्प्यात मिळेल, असे आश्‍वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले असल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.

आमदार नाईक म्हणाले, वारणा प्रकल्पाच्या सांगली जिल्ह्यातील डाव्या व कोल्हापूर जिल्ह्यातील उजव्या कालव्याची अपूर्ण कामे तृतीय सुधारीत मान्यतेनुसार पूर्ण करण्याबाबतची मागणी यापूर्वी आपण केली होती. त्यास मान्यता मिळून ही कामे आता होणार आहेत. 

ते म्हणाले, याबाबत आपण  सभागृहात या कालव्यांची आवश्यकता व येथील शेतकर्‍यांची सद्य परिस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. नंतर सदर योजना प्रवाहित करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे तसेच सदर कालव्यांची कामे पूर्ण करून देण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

आमदार नाईक म्हणाले, वारणा प्रकल्पाच्या शिराळा-वाळवा तालुक्यातील डाव्या कालव्याची व शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यातील उजव्या कालव्याची कामे निधी व सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी  बंद आहेत. वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र कालव्याची कामे अपूर्ण असल्याने तो पाणीसाठा शेतकर्‍यांना प्रवाहित सिंचनासाठी उपयोगात आणता येत नाही. 

ते म्हणाले, वारणा डावा कालवा शिराळा-वाळवा तालुक्यातून व उजवा कालवा शाहुवाडी-पन्हाळा या डोंगरी भागातून जातो. या विभागातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक व अतिअल्पभूधारक आहेत. हे शेतकरी खासगी उपसा सिंचन योजना करू शकत नाहीत.  वारणा डावा कालव्याची लांबी 70 किलोमीटर असून त्यापैकी 40 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 30 किलोमीटरमधील  75 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.  

उजव्या कालव्याची लांबी 60 किलोमीटर असून  कामे  70 टक्केपेक्षा जास्त  पूर्ण झाली आहेत. सदर दोन्ही कालव्यांच्या कामावर आत्तापर्यंत सुमारे 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. अद्यापही 300 कोटी रुपयांच्या दरम्यान अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची आवश्यकता आहे. हा निधी 2 टप्यात द्यावा व ही योजना बंद करू नये यासाठी पाठपुरावा केल्याचे आमदार नाईक यांनी शेवटी सांगितले.

 

Tags : sangli, sangli news, Varana canals, Three hundred crores, Funds


  •