Mon, Jun 17, 2019 02:23होमपेज › Sangli › मिरजेत तीन घरफोड्या; लाखाचा ऐवज लंपास   

मिरजेत तीन घरफोड्या; लाखाचा ऐवज लंपास   

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

येथील जवाहर चौकात असणार्‍या देवल कॉम्प्लेक्समधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. सोने व रोकड असा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तिसरी चोरी सुभाषनगर येथे झाली. 

देवल कॉम्प्लेक्स दुसर्‍या मजल्यावर बाबासाहेब लालासाहेब डुबल या निवृत्त शिक्षकाचा फ्लॅट आहे. बाबासाहेब, त्यांची पत्नी व मुलगा असे तिघे जण तेथे राहतात. मुलगा आनंद व पत्नी सुनीता हे दोघे आगळगावला गेले होते. बाबासाहेब हे गुलबर्गा येथे मुलीकडे गेले होते. दुपारी बाबासाहेब यांनी घरी फोन केला होता. फोन उचलत नसल्याने त्यांनी याच अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या एकाला फ्लॅटमध्ये जाण्यास सांगितले. त्यावेळी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर सुनीता व मुलगा आनंद हे घरी आले. घराचे दोन दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन कपाटातील एकूण 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. देव्हार्‍यातील मूर्तीच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन लंपास केली. आतील एका कपाटामध्ये पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या मात्र चोरट्यांना दिसल्या नाहीत. त्यामुळे त्या सुदैवाने तशाच राहिल्या. घरातील सर्व ठिकाणी चोरट्यांनी शोधाशोध केली. या अपार्टमेंटमधील तळमजल्यावर रामचंद्र सावंत यांचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांनी भाड्याने दिला होता. तोही फ्लॅट बंद होता. त्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांनी श्‍वानासह तपास केला. या अपार्टमेंटच्या मागील बाजूस खंदक आहे. त्या खंदकाच्या दिशेने श्‍वानाने माग काढला. 

तिसरी चोरी सुभाषनगर येथील अंजना अविनाश कांबळे यांच्या दक्षिण पार्क, पोल्टी फार्म जवळ असणार्‍या पत्र्याच्या घरात झाली. अडीच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे दोन मंगळसूत्र, बोरमाळ असा एकूण 18 ग्रॅमचे सोने व एक मोबाईल लंपास झाला. पहाटे कांबळे उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.