Wed, Sep 19, 2018 10:34



होमपेज › Sangli › तीन संधीत ‘टीईटी’ उत्तीर्ण न झाल्यास नोकरीवर पाणी

तीन संधीत ‘टीईटी’ उत्तीर्ण न झाल्यास नोकरीवर पाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधीत उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधीची गणना दि. 30 जून 2016 पासून पुढील लगतच्या तीन ‘टीईटी’साठी (शिक्षक पात्रता परीक्षा) आहे. जून 2017 मध्ये पहिली संधी झाली आहे. आता दोन संधी उरल्या आहेत. तीन संधीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षक पदाच्या नोकरीवर पाणी फिरणार आहे. 

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्‍तीवेळी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) धारण करणार्‍या उमेदवारासच नियुक्‍त करण्यात यावे, असा शासन निर्णय दि. 13 फेब्रुवारी 2013 रोजी झालेला आहे. 

24 नोव्हेंबर 2017 चे परिपत्रक

किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण असणार्‍या उमेदवाराची नियुक्‍ती सरळ सेवेने दि. 13 फेब्रुवारी 2013 नंतर करण्यात आली असल्यास व तो टीईटी उत्तीर्ण नसल्यास प्रथम तीन संधीत टीईटी उत्तीर्ण होणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. या तीन संधीची गणना केव्हापासून करण्यात यावी याबाबत संभ्रम होता. त्यामुळे शासनाने दि. 24 नोेव्हेंबर 2017 रोजी परिपत्रक काढले आहे. तीन संधीची गणना दि. 30 जून 2016 पासून पुढील लगतच्या तीन ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ अशी असेल. दि. 30 जून 2016 नंतर रिक्त पदावर होणारी नवीन नियुक्‍ती ही ‘टीईटी’ धारकाचीच राहील, असेही या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.