होमपेज › Sangli › तीन बोगस डॉक्टरसह चौघांना पोलिस कोठडी

तीन बोगस डॉक्टरसह चौघांना पोलिस कोठडी

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

डोक्यावरील केसांचे बेकायदा  प्रत्यारोपण शस्त्रक्रिया  प्रकरणी अटक केलेले बोगस डॉक्टर सविता अशोक हेरवाडे, योगेश नंदकुमार पोखरणा, सिमरन अभिजित दळवी आणि चित्रा अनिल झाड या चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

येथील राममंदिर रस्त्यावरील   इंद्रनील अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हेअर ट्रान्फ्रंट   या केंद्रात डोक्यावर केसांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. कॉमर्स शाखेची पदवी असणार्‍या स्वयंघोषित तीन महिला डॉक्टरांकडून विनापरवाना हे उपचार सुरू होते. ही माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी  छापा टाकून हा प्रकार चव्हाट्यावर आणला. 

स्वतःला डॉक्टर समजणार्‍या काही तरुणी चक्‍क एका रुग्णाच्या डोक्यावर केश प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करीत असताना रंगेहात सापडल्या.  या ठिकाणी काही औषधे आणि इंजेक्शनच्या सिरींजसुद्धा मिळाल्या.  या प्रकरणी तीन बोगस डॉक्टरांसह चौघांविरोधात बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले  असता त्यांनी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. अ‍ॅड. सकील पखाली सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. 

दरम्यान पोलिस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, अशा पद्धतीने आणखी कोणावर शक्रिया केली आहे का, याचा शोध घेत आहेत.