Mon, Aug 26, 2019 01:52होमपेज › Sangli › महापौरपदासाठी तिघींचे अर्ज

महापौरपदासाठी तिघींचे अर्ज

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 12:44AMसांगली : प्रतिनिधी

महापौरपदासाठी भाजपतर्फे  सौ. संगीता खोत आणि सविता मदने, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे वर्षा अमर निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले. उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि पांडुरंग कोरे यांनी, तर राष्ट्रवादीतर्फे सौ. स्वाती पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवाराचे नाव भाजपतर्फे निवडीदिवशी सकाळीच जाहीर केले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 20 ऑगस्ट) सकाळी 11.30 वाजता निवड सभा होणार आहे. भाजपचे बहुमत असले, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने चमत्कार घडवू, असे सांगितल्याने लढतीत चुरस वाढली आहे.

महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आला आहे. त्यामुळे त्या पक्षाकडून  पहिलीच महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून यासाठी उमेदवारी निवडीबाबत कोअर कमिटीच्या बैठका सुरू होत्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय कोअर कमिटीकडे सोपविला होता. कोअर कमिटीने काहीजणांची नावे सुचविली आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवडीचा चेंडू ढकलला. 

ना. देशमुख आणि कोअर कमिटी सदस्यांनी बुधवारी भाजपच्या सर्व सदस्यांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेशउपाध्यक्षा  नीता केळकर, शेखर इनामदार, दीपक शिंदे आदींची बैठक झाली. महापौरपदासाठी संगीता खोत, अनारकली कुरणे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, कल्पना कोळेकर  इच्छुक होते. त्यापैकी सविता मदने, संगीता खोत, कल्पना कोळेकर, अनारकली कुरणे यांची नावे प्रदेशकडे पाठविली होती. ना. देशमुख यांनीही भाजप सदस्यांची बैठक घेऊन नावाची चर्चा केली होती.    

भाजप नेत्यांच्या बुधवारच्या बैठकीत संगीता खोत आणि सविता मदने यांची  नावे महापौरपदासाठी निश्‍चित करण्यात आली.  उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि पांडुरंग कोरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार  गुरुवारी   अर्ज दाखल केले. श्री. गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, दिनकर पाटील, सभागृह नेते युवराज बावडेकर  यांच्या  उपस्थितीत  अर्ज दाखल करण्यात आले. उपायुक्‍त सुनिल पवार, नगरसचिव के. सी. हळीगंळे यांनी अर्ज स्वीकारले. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, यांच्यासह नेत्यांची बैठक झाली. महापौरपदासाठी काँग्रेसच्या वर्षा  निंबाळकर आणि  उपमहापौरपदासाठी स्वाती पारधी यांचे उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.  माजी महापौर हारुण शिकलगार, माजी गटनेते किशोर जामदार, कमलाकर पाटील,  श्रीनिवास पाटील,  प्रा. पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, संतोष पाटील आदी उपस्थित होते. 

चमत्कार घडवू : कमलाकर पाटील

राष्ट्रवादीचे कमलाकर पाटील म्हणाले,  महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी सर्वसंमतीने दोन महिला उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने बहुमताचा दावा केला तरी आम्ही चमत्कार घडवू.

महापौर-उपमहापौर भाजपचाच होणार : गाडगीळ

आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेत सत्तांतर घडवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आमचे नगरसेवक एकसंध आहेत. महापौर, उपमहापौरपदासाठी सर्व सदस्यांची मते विचारात घेऊन नेत्यांनी सर्वसंमतीने महापौर-उपमहापौरपदासाठी चौघांचे अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या क्षणी उमेदवारी कोणाची ठेवायची आणि कोणाची माघार याचा आम्ही निर्णय घेऊ; पण भाजपचेच महापौर, उपमहापौर विजयी होणार, हे निश्‍चित आहे. निवडणूक लढवून काँग्रेस-राष्ट्रवादीने पराभवाला समोर जाऊ नये.