होमपेज › Sangli › वसंतदादांवर वार करणार्‍यांनी माझ्या नादाला लागू नये : उद्धव ठाकरे

वसंतदादांवर वार करणार्‍यांनी माझ्या नादाला लागू नये : उद्धव ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

वसंतदादांच्या पाठीत वार करणारे आणि सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’ म्हणून ज्यांची हकालपट्टी केली त्या शरद पवारांनी माझ्या नादाला लागू नये. नाही तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे शेतकरी मेळाव्यात दिला. सांगलीतील पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे याला ठार मारून त्याला आंबोलीत पोलिसांनी जाळले. त्याकडे लक्ष न देता मुख्यमंत्री इतरत्र फिरत आहेत. त्याबद्दल त्यांना काहीतरी वाटले पाहिजे, अशी घणाघाती टीकाही  उद्धव ठाकरे यांनी केली. 

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणावर शिवसेनेने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली. 

ते म्हणाले, सध्या पोलिसांची हालत खूपच वाईट आहे.  संशयितांना पोलिस कोठडीत पोलिस ठार मारू लागले आहेत. मुख्यमंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरातबाजी करीत आहेत. आता अनिकेत कोथळेच्या मुलीने ‘माझ्या बाबांना मारले होय मी यांची लाभार्थी आहे’, आणि त्याच्या पत्नीने ‘माझ्या पतीला मारले होय मी यांची लाभार्थी आहे’ असे  म्हणायचे काय? पोलिस खंडणी मागतात, असे भाजपचे आमदारच सांगत आहेत.  

ठाकरे म्हणाले, मी जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी फिरतो आहे आणि शरद पवार माझ्यावर टीका करीत आहेत. मोदी-पवार यांचे गुरू-शिष्याचे नाते आहे म्हणे. पवार म्हणतात की, सत्तेत असून मित्र पक्षावर टीका करणारे मी पहिल्यांदाच बघितले. वसंतदादांच्या पाठीत वार करणारेही मीही पहिल्यांदाच बघितले आहेत. त्यावेळी ‘पुलोद’ काढून खुर्चीसाठी टण करून तुम्ही उडी मारली. सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’, म्हणून तुम्हाला हाकलून दिले होते. तरीही त्यांच्यासोबत राहून तुम्ही 15 वर्षे भांडी घासली. ‘मैद्याचं पोतं’ हे शब्द आम्ही विसरलो नाही. त्या आठवणी आम्हाला काढायला लावू नका. 

ठाकरे पवारांना उद्देशून म्हणाले, आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि आम्हाला सल्ले देऊ नका. आमच्या भगव्याची आपुलकी, जिव्हाळा, निष्ठा शरद पवार पुसू शकत नाहीत. पवार हे मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांचे प्रश्‍न घेऊन भेटत नाहीत तर ते क्रिकेटवर चर्चा करतात. अहो, मुख्यमंत्र्यांकडे प्रश्‍न घेऊन जा, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला. 

कर्जमाफीचा घोटाळा सहन करणार नाही...

ठाकरे पुढे म्हणाले, या सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. त्यापैकी एकतरी शेतकरी येथे उपस्थित आहे का ? मला तरी कोठेच दिसला नाही. कर्जमुक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. त्या कर्जमुक्तीचा घोटाळा तुम्ही केला तर तो आम्ही सहन करणार नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही.          

शेतकर्‍यांना छळणारे स्वराज्याचे दुष्मनच...

ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यावर ठोस उपाय शोधला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी करू नका. हे सरकार जाहिरातबाजी करणारे आहे. शेतकर्‍यांसह सर्वांनाच तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दखविले होते. कुठे आहेत ते अच्छेदिन ? कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांनी किती हेलपाटे मारायचे ? शेतकरी असल्याचा दाखला दाखवायचा ? आता सरकार लायक आहे की नालालक आहे याचा दाखला शेतकरी मागतील. शेतकर्‍यांना छळू नका. शेतकर्‍यांना छळणारे हे स्वराज्याचे दुष्मनच आहे. सौभाग्य योजनाही फसवी आहे.

रस्त्यात खड्डे पडले आता सरकार कोसळेल...

ठाकरे म्हणाले, कोल्हापुरात चंद्रकात पाटील म्हणतात, रस्त्यात खड्डे पडले तरी काय होते ? अहो, पालकमंत्री, रस्त्यात खड्डे पडले तर उद्या सरकार कोसळेल. त्याचं काय ? 

महापालिकेवर भगवा फडकवा...

सांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीविषयी ते म्हणाले, आठ महिन्यांनी महापालिकेची निवडणूक आहे. गुंठेवारी, रस्ते असे अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडवायचे असतील तर शिवसेनेच्या ताब्यात सत्ता द्या. मुंबईची सत्ता  इतकी वर्षे शिवसेनेकडे आहे. तिथे आम्ही काम केले आहे. तसे येथेही काम करू.  दिल्लीत सत्ता आली असतानाही मुंबईकडे भाजपचा वाकडा डोळा होता. तो  जनतेनेच सरळ केला आहे. मला सांगलीने आजपर्यंत काय दिले ? याचा विचार करणारे आम्ही कपाळकरंटे नाही. आता सांगली आम्हाला भरभरून देईलच. 

ठाकरे म्हणाले, नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रासच झाला. नोटबंदीमुळे दहशतवाद संपला नाही उलट वाढला. दहशतवाद   आपल्या जवानांच्या बलिदानामुळे मोडला जात आहे. आता जनतेने मिशीला पिळ दिला पाहिजे नाही तर सरकार तुम्हाला पिळेल.  

यावेळी सुभाष पाटील या शेतकर्‍याने मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी स्वागत केले. संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी आभार मानले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दादासाहेब भुसे, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार गजानन किर्तीकर, दगडू सपकाळ, रावसाहेब घेवारे, तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, अमोल पाटील, शेखर माने, पृथ्वीराज पवार, विशाल राजपूत, गौतम पवार, विकास कोल्हटकर, बजरंग पाटील, सुनिता मोरे, दिगंबर जाधव, महोदव हुलवान, पप्पू शिंदे, प्रदीप कांबळे, संजय काटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

गुजरातेत निवडणूक जिंकली तरी विशेष नाही..

उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरात निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी हे 50 सभा घेणार आहेत. एकट्या 22 वर्षांच्या हार्दिक पटेलने त्यांच्या नाकात दम आणला आहे. त्याला तुम्ही घाबरला आहात. हार्दिकच्या सीडी दाखविण्यापेक्षा तुमच्या कामाच्या दाखवा. हार्दिक माझ्याकडे आला तर यांच्या पोटात दुखते. गुजरातची निवडणूक जिंकली तरी काही विशेष वाटणार नाही. लोक मेले तरी चालतील; पण निवडणूक जिंकली पाहिजे, असे भाजपला वाटते.