Wed, Feb 20, 2019 19:59होमपेज › Sangli › थर्टी फर्स्टला रिचवली लाखो लिटर दारू

थर्टी फर्स्टला रिचवली लाखो लिटर दारू

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:06AM

बुकमार्क करा
सांगली :  प्रतिनिधी

दरवर्षीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना रविवारच्या सुटीमुळे उधाण आल्याचे दिसून आले. रविवार असल्याने मद्य विक्री नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झाल्याचे बार चालकांकडून सांगण्यात आले. तळीरामांनी हजारो लिटर दारू थर्टी फर्स्टला रिचवली. हजारो किलो मांस विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रात्रीही मटण, चिकनच्या दुकानात रांगा लागल्या होत्या.      

थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला होता. रविवारी रात्री आठपासूनच पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे रात्री नऊनंतर रस्ते ओस पडल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणी हॉटेलचालकांनी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 

दरवर्षीप्रमाणेच थर्टी फर्स्टला लाखो लिटर दारूची विक्री होत असताना यावर्षी त्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. पोलिसांचा रात्रभर असलेला बंदोबस्त आणि कारवाईच्या इशार्‍यामुळे अनेक बार, हॉटेल्स थर्टी फर्स्ट असूनही रिकामेच दिसत होते. 

पोलिसांच्या बंदोबस्ताने दारू विक्रीला फटका बसला असला तरी नंतरच्या दोन दिवसात हा फटका भरून निघेल, अशी अपेक्षा बार चालकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कारवाईचा आधीच इशारा दिल्याने लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने किरकोळ अपवाद वगळता या दिवशी जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडले नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडला.