Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Sangli › सांगलीत सात ठिकाणी लूटमार

सांगलीत सात ठिकाणी लूटमार

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीसह परिसरात चोरट्यांनी बुधवारी रात्री धुमाकूळ घातला. वसंतदादा साखर कारखाना परिसर आणि कवलापूर अशा सात ठिकाणी चाकूचा धाक दाखवून, मारहाण करीत लूटमार केली. या लूटमारीत सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने, रोख 60 हजार रुपये आणि तीन मोबाईल लंपास झाले आहेत. या चोर्‍यांची नोंद सांगली शहर, सांगली ग्रामीण आणि संजयनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

दरम्यान, कवलापूर येथे संतोष मारुती साबळे (वय 29) यांनी  आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यांच्या हातावर आणि मांडीवर हे वार झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कवलापूर-बुधगाव रस्त्यावर साबळे यांचे जयभवानी किराणा दुकान आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघेजण एका दुचाकीवरून आले. एकजण बाहेर थांबला आणि दोघे दुकानात गेले. संतोषला चाकूचा धाक दाखवत दुकानातील गल्ल्यात असलेले 16 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकाने  तलवारीने वार केले. त्यानंतर चोरटे पळून गेले. संतोष याने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. 

येथील शंभरफुटी रस्त्यावर सुधीर शिवलिंग सगरे (रा. किसान चौक) हे खानावळ चालवतात. ते औषध दुकानात गेले होते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून तिघेजण आले. चाकूचा धाक दाखवून त्यांची अडीच 
तोळ्याची सोन्याची चेन लंपास केली. 

विद्यासागर महावीर आवटे  (रा. त्रिकोणी बाग) हे सिव्हील चौकातील एका दुकानात काम करतात.ते बुधवारी रात्री शंभर फुटी रस्त्याकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. एकाने चाकूचा धाक दाखवून विद्यासागर यांच्याकडील बाराशे रुपये पळविले. या दोघांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

संपत चौकातील दारू दुकानासमोर बुधवारी रात्री मंजुनाथ विरसंगाप्पा धाननवर आणि  महिंद्र  अरविंद कांबळे ( रा. पंचशीलनगर) हे दोघे  बोलत  होते. रात्री बाराच्या  सुमारास अज्ञात तिघेजण दुचाकीवरून आले.  चाकूचा धाक दाखवून दोघांनाही लुटण्यात आले. मंजुनाथ यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन, एक तोळ्याचा बदाम आणि गल्ल्यातील रोख 42 हजार रुपये पळवले.  महेंद्र याच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. या दोघांनीही संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पंचशीलनगर येथे अशोक रंगराव खराडे  यांच्या किराणा दुकानात  अज्ञात चोरटे दुचाकीवरुन आले. त्यांच्याकडे असलेले साडेसहा हजार  रुपये चाकूचा धाक दाखवून काढून घेतले.  जवळच निलेश दत्तात्रय ढोबळे थांबले होते. त्यांनाही धमकावून त्यांचा 23 हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. 

कर्नाळ रस्त्यावरील बसस्टॉपजवळ स्मिता राजेंद्र सूर्यवंशी (रा. कसबे डिग्रज ) या बुधवारी दुपारी थांबलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पिशवीतील पर्स  लंपास झाली. त्यामध्ये 38 हजार  रुपयाचे मंगळसूत्र आणि रोख 1 हजार रुपये होते. त्यांनी  शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.