होमपेज › Sangli › समाजाच्या बेड्या झुगारून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला ते दोघे विवाहबध्द

समाजाच्या बेड्या झुगारून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला ते दोघे विवाहबध्द

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

समाजाने आखलेल्या जाती, रुढी, परंपरेच्या बेड्या झुगारून देत तसेच धार्मिक कर्मकांडांना तिलांजली देत ‘व्हॅलेटाईन डे’च्या पूर्वसंध्येला सूरज कोळी व रोहिणी वाघमारे या दोघांनी आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला. 

अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीच्यावतीने राजर्षी शाहू आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्र सुरू आहे. आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सर्वप्रकारचे सहाय्य या ठिकाणी केले जाते. जत तालुक्यातील खलाटी येथे राहणारे सूरज कोळी व रोहिणी वाघमारे या दोघांनी आंतरजातीय विवाह करण्याबाबत सांगली अंनिसशी संपर्क साधला. अंनिसच्यावतीने त्यांचा विवाह लावून देण्याचे निश्‍चित केले. कोणताही मुहूर्त न पाहता, कोणतेही कर्मकांडे न करता व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरले. अंनिसच्या संजयनगर येथील कार्यालयात वधू-वरांना महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी पद्धतीने एकनिष्ठतेची शपथ राहुल थोरात यांनी दिली. वधू- वरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांच्या पूजन करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना पुष्पहार घालून विवाह संपन्न झाला. विवाहाचे प्रमाणपत्र प्रा. प. रा. आर्डे यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी सुहास पवार, सुहास यरोडकर व वधू-वरांचे मित्रमंडळी उपस्थित होती.