Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Sangli › उमेदवारी मिळालीच, या भ्रमात कोणी राहू नये

उमेदवारी मिळालीच, या भ्रमात कोणी राहू नये

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:52PMसांगली : प्रतिनिधी

उमेदवारी निश्‍चित झाल्याच्या अफवा जर कोणी पसरवत असेल. तसे समजून कोण जनतेसमोर जात असेल तर या भ्रमात कोणी राहू नये, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील  यांच्यासह नेत्यांनी लगावला. येथील लव्हली सर्कल चौकात काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानात ते बोलत होते.  पक्षश्रेष्ठी आणि जनतेतून मेरिट पाहूनच उमेदवारी निश्‍चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसनेत्या जयश्री पाटील म्हणाल्या, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात भाजपला उमेदवारही मिळेनात.

बैठकीत सुशील हडदरे, मुबारक मौलवी, मुजीर जांभळीकर यांच्यासह अनेक नागरिक, इच्छुकांनी नवे उमेदवार द्यावेत, विद्यमानांकडून परस्पर उमेदवारी जाहीर केल्याबद्दल तक्रारी मांडल्या. याचा नेत्यांनी समाचार घेतला. आम्ही उमेदवार जाहीर करीत नाही, तोपर्यंत कोणीही संभ्रमात राहू नये, असे सांगत नव्या-जुन्या वादावर पडदा टाकण्यात आला.पृथ्वीराज पाटील म्हणाले, प्रभाग 9 हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पद्मभूषण (कै.) वसंतदादा पाटील  आणि ( स्व.) मदनभाऊ पाटील यांच्या पाठीशी हा भाग 100 टक्के राहिला आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत येथून कायम काँग्रेसला मताधिक्क्य मिळाले आहे.  काँग्रेसने त्याच जोरावर या परिसराचा कायापालट केला आहे. तब्बल 50 कोटींहून अधिक रकमेची विकासकामे येथे झाली आहेत. यावेळीही जनता 100 टक्के काँग्रेसच्या मागेच राहणार आहे. उलट भाजपला येथे उमेदवार मिळत नाही. उसनवारीवर असलेल्या भाजपचा गाडा सांगलीत सर्व्हेक्षणातून दोन अंकीपर्यंतही पोहोचलेला नाही. या प्रभागात तर भाजप उमेदवारांचे डिपॉझिटही राहणार नाही.

जयश्री पाटील म्हणाल्या, या प्रभागात धोत्रेआबा घरकुल, ड्रेनेज व पाणी योजनेची कामे मार्गी लावली आहेत.  आरक्षण हटवून लोकांना मालकीची प्रमाणपत्रे दिली आहेत. उलट भाजपने या प्रभाग आणि शहरासाठी काय केले? नगरसेवक संतोष पाटील म्हणाले, उमेदवारी कोणालाही द्या, येथून पॅनेल 100 टक्के विजयी होणारच.  युवानेते विशाल पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, गुलजार पेंढारी, अतुल माने, ईलाही बारुदवाले, बंडू सरगर, इरफान मुल्ला, शहानवाज फकीर, शहाजी सरगर उपस्थित होते. 

रेल्वे उड्डाणपूल अन् खोकी पुनर्वसनाचे काय?

येथील विश्रामबाग उड्डाणपुलाचे रखडलेले काम आणि तेथून हटविलेल्या खोक्यांच्या पुनर्वसनाबाबतही नागरिक, खोकीधारकांनी जाब विचारला. आणखी किती वर्षे हा खेळ चालणार, असा संतापही त्यांनी व्यक्‍त केला, रेल्वे उड्डाणपुलामुळे परिसरातील नागरिकांना सह्याद्रीनगरमार्गे फिरून जावे लागत असल्याच्या तक्रारी मांडल्या. तेथील खोक्यांच्या पुनर्वसनाबाबत  बैठका झाल्या, पण ती कामे कधी होणार, असा सवाल विचारला.