होमपेज › Sangli › तासगावात विकासाची आश्‍वासने हवेतच

तासगावात विकासाची आश्‍वासने हवेतच

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:30PMतासगाव : प्रमोद चव्हाण

तासगाव पालिकेच्या निवडणुकीत शहराचा  कायापालट करण्याच्या घोषणा झाल्या होत्या. पालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे आता खरोखरच शहरात विकासाची गंगा वाहू लागणार असे नागरिकांना वाटत होते. मात्र दोन वर्षांतच जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. विकासाची गंगा वाहत असलेली तर दिसली नाहीच पण विकासाला पूर्णच खीळच बसल्याचे चित्र दिसते आहे.तासगाव पालिकेत पावणे दोन वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. खासदार संजय पाटील गटाचा पालिका निवडणुकीत  पहिल्यांदाच एवढा मोठा विजय झाला.  भाजपचे नाव पहिल्यांदाच पालिकेच्या राजकारणात झळकले.

निवडणूक काळात सत्ताधार्‍यांकडून आश्‍वासनांची खैरात करण्यात आली होती. औद्योगिक वसाहत, शहरात चार बगीचे, कापूर ओढ्याचे सुशोभीकरण, चोवीस तास पाणीपुरवठा, चौकांचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशी अनेक आश्‍वासने देण्यात आली होती. मात्र त्यांचा  विसर पडायची सुरुवात अवघ्या सहा महिन्यांतच झाली होती. 

आश्‍वासने देताना ती पूर्ण होतील, की नाही यांचा फारसा विचार झाला नव्हता. तसेच पालिकेच्या सत्तेत आपण नवखे आहोत, याचाही विसर पडला होता. त्यामुळे विचारणा केल्यानंतर ‘आम्ही आत्ताच सत्तेत आलोय, जरा तरी वेळ द्या’, अशी उत्तरे मिळू लागली. आता दोन वर्षे संपली आहेत. या काळात एकही नाव घेण्यासारखे ठळक काम दिसलेले नाही . किंवा कारभारातही फारशी सुधारणा जाणवलेली नाही.  त्यामुळे पुढील तीन वर्षे कोणती कामे कशी होणार याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे.

खरे म्हणजे  खासदार पाटील यांना पालिकेतील सत्तेच्या  माध्यमातून शहरात भक्कमपणे  पाय रोवण्याची ही फार  मोठी संधी प्राप्त झाली होती. शासनाच्या योजना आणि  आलेला निधी नियोजनपूर्वक वापरुन शहराचा कायापालट करता आला असता. वास्तविक कोट्यवधी रुपयांचा निधी खासदार पाटील यांनी सहज खेचून आणला; मात्र तो योग्य पद्धतीने वापरात आणणे पालिकेतील सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांना निदान अजूनपर्यंत तरी  जमलेले नाही. गेल्या दोन वषार्ंत दाखवण्याजोगे एकही काम पालिकेकडून झाले नसल्याचे शल्य खुद्द सत्तारुढ गटातील काहीजण खासगीत बोलून दाखवत आहेत.
वास्तविक जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता असलेली तासगाव ही एकमेव नगरपालिका  आहे. शहरात खासदारांचा प्रभावही मोठा आहे. मात्र त्यांनी  सत्ता आल्यापासून केवळ तीन ते चार वेळाच धावती भेट पालिकेला दिली आहे. त्यामुळे सत्तारुढ गटावर   कुणाचाच अंकुश  नाही अशी स्थिती आहे.

आदर्श नगरपालिका झाली असती

खासदार पाटील यांनी  शहरासाठी भरपूर निधी आणला.  ‘क’ वर्गातील सर्वात मोठी पालिका म्हणून तासगाव पालिकेचा गौरव आहे. मात्र  निधी उपलब्ध असूनही सत्ताधार्‍यांना कामे करता आली नाहीत. शहरातील पाणीपुरवठा, साफसफाईसह सर्व समस्या जैसे थे आहेत. याउलट काही दिवसांत 13 कोटी रुपये खर्चले नाहीत म्हणून ते शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहेत. तो निधी नियोजनपूर्वक खर्च केला असता तर ही पालिका  निदान जिल्ह्यात तरी आदर्श  ठरली  असती.

सभा गुंडाळण्याची परंपरा कायम

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचे सांगितले जाते. मात्र या  शहरात तरी या पक्षाला हा नियम लागू नसावा असे दिसते आहे. कारण  पालिकेत सत्तारुढ गटातच अनेक उपगट तयार झाले आहेत. कामे न झाल्याबद्दल प्रत्येक गट दुसर्‍याला दोष देत असतो. राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत पालिकेची सभा निदान पाच मिनिटे तरी चालत असे. भाजपची सत्ता आल्यानंतर ती आता एक-दोन मिनिटांतच संपते. सभेत शहरातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होईल अशी अपेक्षा  फोल ठरली आहे. सभा  गुंडाळण्याची परंपरा मात्र कायम आहे.