Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Sangli › मोबाईलवर लायसन्सचा आदेशच नाही

मोबाईलवर लायसन्सचा आदेशच नाही

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

वाहतूकीचे नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्ससह मूळ कागदपत्रांऐवजी मोबाईलवरील ई-कॉपी दाखवावी असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाचे अजून कायद्यात रूपांतर झालेले नाही. तसेच त्याबाबतचे लेखी आदेशही आरटीओ तसेच पोलिस विभागाला देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून अद्यापही जुन्या पद्धतीनेच कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. 
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांना ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत तसेच अन्य मूळ कागदपत्रे दाखवावी लागत होती. अशा तपासणीवेळी अनेकदा पोलिस तसेच आरटीओ निरीक्षकांकडून ती कागदपत्रे जप्त केली जात होती. ही जप्त केलेली कागदपत्रे हरवण्याचे प्रमाण अधिक होते. हरवलेली कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी वाहनधारक, पोलिस, वाहतूक विभागास शक्य होत नव्हते. यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर केंद्री वाहतूक मंत्रालयाने आता पोलिस, आरटीओंना दाखवण्याच्या कागदपत्रांबाबत नवीन नियम केला आहे. 

पोलिस, आरटीओंच्या तपासणीवेळी आता मूळ कागदपत्रे न दाखवता मोबाईलमधील ई-कॉपी दाखवणे पुरेसे ठरेल असा नवीन निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील तरतूदींचा उल्लेख करत राज्यातील पोलिस आणि अन्य वाहतूक विभागांना तसे आदेश दिले आहेत. वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि विमा यांची मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी घेणण्याची गरज नाही. 

परिवहन आणि डिजिलॉकर या अ‍ॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशी कागदपत्रे जप्त करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. नागरिकांनाही ही कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्यकता रहाणार नाही. शासनाने असा निर्णय घेतला असला तरी वाहतूक कायद्यामध्ये त्याचे अद्याप रूपांतर झालेले नाही. त्यामुळे मोबाईलवरील ई-कॉपी तपासण्याचे कोणतेही आदेश अद्यापपर्यंत वाहतूक पोलिस किंवा परिवहन विभागाला देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी जुन्या पद्धतीनेच कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे चित्र आहे.  

परिवहन, डिजिलॉकर अ‍ॅप महत्वाचे...

केंद्र शासनाच्या ई-कॉपीच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अन्य कागदपत्रांचा फोटो दाखवणे ग्राह्य मानले जाणार नाही. यासाठी केंद्र शासनाचे परिवहन अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर वाहनाची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. केवळ या अ‍ॅपमध्ये असणारीच कागदपत्रे तपासणीवेळी ग्राह्य धरली जाणार आहेत. परिवहन अ‍ॅपशिवाय डिजिलॉकर या अपॅवर अपलोड केलेली कागदपत्रेही ग्राह्य धरली जातील. अन्य कोणत्याही प्रकारची ई-कॉपी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे शासनाने या निर्णयात म्हटले आहे.