Sun, May 26, 2019 01:30होमपेज › Sangli › घातकी भाजपबरोबर शिवसेनेची युती नाही

घातकी भाजपबरोबर शिवसेनेची युती नाही

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

भाजपचे राजकारण घातकी आहे. त्यांनी  आता युतीची भाषा कितीही केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.   स्वबळावरच सर्व निवडणुका लढवण्याचे आदेश शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यादृष्टीनेच महापालिका निवडणुकीसाठीही आमची तयारी  सुरू आहे, अशी माहिती   शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी   पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, भाजपवाले कसे वागत आहेत, ते जग जाहीर उघड आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होती. तरी त्यांनी ती निवडणूक सोडून दिली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा फौजफाटा पालघरमध्ये थांबला होता. कारण त्यांना शिवसेनेला विरोध करायचा होता. हे सारे करून झाल्यावर हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्याचा आव आणला जात आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचे समर्थन करणार्‍या पीडीपीबरोबरची युती मात्र त्यांच्याकडून विसरली जात आहे. ते आम्ही मात्र विसरू शकत नाही.  

ते  म्हणाले, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षातर्फे यापूर्वीच झाला आहे.   आमची स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी झाली आहे.   ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी वाटली जाणार नाही. ज्याला पक्षाचा विचार पटतो आहे, असे अनेक चांगले लोक पक्षात आले आहेत. चांगले उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असेल.बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय विभुते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, नगरसेवक शेखर माने, उपाध्यक्ष शंभोराज काटकर, शहराध्यक्ष मयूर घोडके, अमोल पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक गौतम पवार, पृथ्वीराज पवार हे मात्र बैठकीस अनुपस्थित होते. 

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपला संधी देऊन पाहिली

प्रा. बानुगडे- पाटील म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील जनतेने याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सगळ्यांना सत्तेत संधी दिली होती.  परंतु त्यांना सांगली चांगली करता आली नाही. त्यामुळे मुंबई, ठाण्याप्रमाणे महापालिकेचा कारभार उत्तमरित्या चालवणारी शिवसेनाच सांगलीसाठी योग्य पर्याय ठरेल.