Mon, Aug 19, 2019 07:27होमपेज › Sangli › आता इशारे नाहीत, आर या पारचीच लढाई

आता इशारे नाहीत, आर या पारचीच लढाई

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 7:53PMसांगली : प्रतिनिधी

कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्य शासनासोबत अनेक बैठका केल्या. मात्र त्यातूनही आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटीत बदल यासारख्या प्रमुख मागण्या अद्यापही प्रलंबितच आहेत. त्यामुळे आता या सरकारला इशारे बास झाले, आता आरपारचीच लढाई लढू, असा सूर सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत उद्घाटनावेळीच उमटला. प्रारंभी समाजातील महिला, मुलींच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन येथील भारती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. दीपप्रज्ज्वलनानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, भैय्यू महाराज, राहुल फटांगडे, सीमेवरील जवान, शेतकरी तसेच अन्य दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटनानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी कामाचा आढावा घेतला. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील होतकरू, बेरोजगार तरूणांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र बँका अशा प्रकारे कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारीही यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता इशारे न देता कर्ज न देणार्‍या बँकांचे कामकाज बंद पाडण्याचे आंदोलन हाती घ्यावे, असा सूर उमटला. 
शासनाबरोबर झालेल्या अनेक समन्वय बैठकांमधून अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. ईबीसी सवलतीशिवाय या शासनाने मराठा समाजाला काहीही दिलेले नाही. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणासह अन्य मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आता आरपारच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याचे परखड मतही वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाल्यानंतर मराठा समाजाने बैठकांतून इशारा देण्यापलीकडे काही केले नाही. मराठे आता एकत्र येऊ शकत नाहीत, असा आरोप केला जात आहे. मात्र मराठ्यांचे आंदोलन संपलेले नाही. मराठ्यांची एकत्र आलेली शक्ती आजही टिकून आहे. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र या प्रकरणात शासन पुढील कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेविरोधात लढण्यासाठी शासनावर दबाव वाढविण्याची गरज असल्याचे मतही प्रतिनिधींनी व्यक्त केले. 

मागासवर्गीय आयोगाला समाजातर्फे लाखोंच्या संख्येने निवेदने दिली आहेत. या आयोगाची लवकर सुनावणी घेण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. शिवाय आयोगातर्फे राज्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे समाज बांधवांनी जागरूक राहण्याची गरज आहे. शासनाने आतापर्यंत मराठा समाजासंदर्भात काढलेल्या अध्यादेशांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना होत नाही, असेही मत यावेळी मांडण्यात आले. 

मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, छत्रपती शाहू महाराज संशोधन केंद्र, गडकोटांचे संवर्धन, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक आदी विषयांवर  चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे दिलीप पाटील, सोलापूरचे माऊली पवार, अहमदनगरचे संजीव भोर-पाटील आदींनी मते मांडली. स्वागत विलासराव देसाई यांनी केले. प्रास्ताविक डॉ. संजय पाटील यांनी केले. यावेळी नीना देसाई, सुनीता मोरे, आशा पाटील, सुप्रिया घाटगे, सुजाता भगत, गीतांजली देसाई, वैष्णवी देसाई, खुशी चव्हाण, श्रीरंग पाटील,  प्रवीण पाटील यांच्यासह क्रांती मोर्चाचे विविध जिल्ह्यांतील समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते. नितीन शिंदे, विशाल पाटील, सुनील गिड्डे, प्रशांत भोसले, संभाजी पोळ आदींनी संयोजन केले. राजेंद्र पाटील, नितीन चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले.

विद्यार्थ्यांना निधीसाठी प्रयत्न...

समाजातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करायचे असेल तर अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर 100 विद्यार्थ्यांची यादी बनवून प्रति विद्यार्थी एक लाख रूपये याप्रमाणे शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी क्रांती मोर्चातर्फे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी यावेळी नव्याने पुढे आली. त्यावर सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातून असे प्रस्ताव सादर करून शासनासोबतच्या पुढील बैठकीत ते प्रस्ताव द्यावेत, असाही निर्णय घेण्यात आला. 

खोडा घालणार्‍यांचा बंदोबस्त करणार...

मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पडली आहे, समाजात फूट पडली आहे, असा अपप्रचार करणारे, समाजाच्या मागण्यांमध्ये खोडा घालणार्‍यांची नावे समन्वय समितीला माहीत आहेत. समाजातील लोकांनाही अशांची नावे लवकरच सांगण्यात येतील. समाजाच्या मागण्यांमध्ये, आंदोलनांमध्ये जे कोणी खोडा घालतील मग ते राजकीय, सामाजिक, स्वजातीय असले तरी त्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा यावेळी बैठकीत अनेकांनी दिला.