Thu, Apr 25, 2019 04:09होमपेज › Sangli › जतमध्ये सीमाभागात मराठी शाळा नाहीत

जतमध्ये सीमाभागात मराठी शाळा नाहीत

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यातील कर्नाटक सीमाभागातील गावांमध्ये मराठी शाळा नसल्याचा प्रश्‍न विधीमंडळ अधिवेशनात तारांकित झाला आहे. दरम्यान, 21 गावांमधील मराठी माध्यमिक शाळांची मान्यता शासनस्तरावरच रखडलेली आहे. तर 77 वाड्या-वस्त्यांवरील मराठी प्राथमिक शाळांची मागणीही प्रलंबित राहिलेली आहे. जत तालुक्यातील 9 गावे आणि 79 वाड्या-वस्त्यांवर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळाच नाहीत. कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. ही गावे कन्नडबहूल असली तरी त्याठिकाणी मराठी भाषिकही आहेत. त्यांच्या मुलांना मराठीतून शिकण्यासाठी मराठी शाळाच नाही. राज्य शासनाने 1 सप्टेंबर 2012  रोजी राज्यातील सीमाभागातील 101 गावे, वाड्या-वस्त्यांवर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामध्ये जतमधील 9 महसुली गावे आणि 79 वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान,  कर्नाटक सीमावर्ती 21 गावांमधील मराठी माध्यमिक शाळांची मान्यताही रखडली आहे. 

आमदार दत्तात्रय सावंत, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील यांनी सीमाभागात मराठी शाळांसाठी विधीमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. जत तालुक्यातील मोरबगी, हळ्ळी, तिकोंडी, गुगवाड, बालगाव या गावांमध्ये तसेच अनेक गावांमध्ये मराठी माध्यमाची शाळा नसल्याचे निदर्शनास येते हे खरे आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. या भागात मराठी शाळा नसल्याने मराठी भाषिक विद्यार्थ्यांना कन्नड माध्यमातून शिकावे लागते. त्यामुळे कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून मागणी आली आहे काय? त्यावर शासनाने काय कार्यवाही केली आहे अथवा केली जात आहे, असा प्रश्‍न या आमदारांनी नागपूर येथील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे.