Tue, Apr 23, 2019 10:19होमपेज › Sangli › कृष्णा, वारणा वाहत्या; तरी टंचाई कायमच

कृष्णा, वारणा वाहत्या; तरी टंचाई कायमच

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 9:09PMसांगली : शशिकांत शिंदे

कोयना धरणात सध्या तब्बल  70 टीएमसी पाणीसाठा आहे. त्या पैकी किमान 40 टीएमसी पाणी वापरता येईल, असा पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांचा दावा आहे. मात्र नियोजनाचा अभाव, प्रश्‍न कायमचा सोडवण्याबाबत राजकीय नेत्यात असलेली उदासीनता यामुळे  शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत. कृष्णा आणि वारणा या नद्या वाहत्या असूनही दुष्काळाचे संकट कायमच आहे. 

सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग हा आतापर्यंत दुष्काळी म्हणून ओळखला जात होता.  ज्येष्ठ नेते (स्व.) वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीने ताकारी, म्हैसाळ योजनांचा  प्रारंभ झाला.  माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील,  माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे निधी उपलब्ध होऊन या योजनांच्या मुख्य कालव्याची कामे सुरू झाली. आता पोटकालवे आणि वितरण व्यवस्था तयार करणे बाकी आहे. पोटकालव्या ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानामुळे बंदिस्त पाईपद्वारे हे पाणी शेतापर्यंत देण्याचे सरकारचे धोरण आहे. 

गावोगावच्या शेतकर्‍यांनी एकत्र येऊन बचत गट केल्यास एक पीक योजना राबवता येऊ शकते. त्यातून उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचयात समिती आणि ग्रामपंचायत समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सध्या म्हैसाळसाठी 90 तर ताकारीसाठी 65 पाणी संस्था तयार झाल्या आहेत. प्रत्येक गावांत अशा संस्था सुरू होणे गरजेचे आहे. 

कारखान्यांचा पुढाकार आवश्यक

टेंभू, ताकारी योजनेच्या वसुलीसाठी त्या भागातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकर्‍यांच्या येणार्‍या उसातून प्रति टन पैसेे घेतले जात आहेत. कारखाने आधीच पैसे भरतात. म्हैसाळसाठीही या परिसरातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र ते होताना दिसत नाही. 

अपारंपरिक ऊर्जेची  गरज  

जिल्ह्यात पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. त्या प्रमाणे उन्हाळ्यात मुबलक सूर्यप्रकाश असल्याने सौरऊर्जाही उपलब्ध होऊ शकते. टेंभूसाठी 60 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याप्रमाणे म्हैसाळसाठीही असा प्रकल्प झाल्यास वीज बिल फारसे येणार नाही. 

एक टीएमसीतून 100 कोटींचे उत्पन्न

एका टीएमसी पाण्याच्या सिंचनातून सुमारे 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, असा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचा दावा आहे. जिल्ह्याला किमान 30 ते 40 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शेतकरी मिळवू शकतात.  परिणामी बेरोजगारीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. दुष्काळात एका टँकरसाठी 5 हजार रुपयापर्यंत  किंमत मोजणारे या भागातील शेतकरी पाणी पट्टी, वीज बिल भरण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. 

Tags : Sangli, Sangli News,  currently, 70 TMC, water, storage, Koyna Dam