होमपेज › Sangli › इस्लामपुरात एकाच प्रभागात १६८१ बोगस मतदार

इस्लामपुरात एकाच प्रभागात १६८१ बोगस मतदार

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:49PMइस्लामपूर : वार्ताहर

शहरातील प्रभाग क्र. 1 मध्ये 1681 बोगस मतदान असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारात जे सामील आहेत त्या सर्वांवर व दुबार मतदान करणार्‍यांवर 15 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करावेत. तसेच येथे फेर निवडणूक घ्यावी. अन्यथा उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील व शहराध्यक्ष अशोक खोत यांनी पत्रकार बैठकीत दिला.

याबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.खोत व पाटील म्हणाले, आजपर्यंत या प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवकाने बोगस मतदानावरच निवडणुका जिंकल्या. शहरातील प्रत्येक प्रभागात बोगस मतदान आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये तर कर्नाटकातील लोकांचे गेल्या 30-35 वर्षापासून मतदान आहे. या ज्येष्ठ नगरसेवकाने काहींना हाताशी धरून हे बोगस मतदान नोंदल आहे. ते लोक दोन्हीकडे मतदान करतात. त्यामुळे प्रभागातील मतदारांवर अन्याय होत आहे. ज्यांनी बोगस मतदान नोंदले आहे तेच या लोकांच्या नावावरील रेशनही उचलत आहेत. त्यांचे बोगस मतदान ओळखपत्र व रेशनकार्डही काढण्यात आले आहे. ते लोक येथील रहिवाशीच नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर आहे.  

पाटील म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून प्रभागातील घराघरात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी प्रभागात प्रत्यक्षात 3200 लोकच राहत असल्याचे स्पष्ट झाले. मतदान मात्र 4 हजार 800 वर आहे.  या बोगस मतदारांनी दुबार मतदान केल्याची माहितीही गोळा केली आहे. 

एकाच घरात वेगवेगळ्या जातीचे 132 मतदार...

या प्रभागातील एकाच घरात 132 एवढी मतदारसंख्या आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व मतदार वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहेत. ते एका घरात रहात आहेत. या घराचा नंबरही बोगस आहे. तो घर नंबर अस्तित्वातच नाही, असे पाटील व खोत यांनी सांगितले.