Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Sangli › बंगला फोडून १९ लाखांचा ऐवज लंपास

बंगला फोडून १९ लाखांचा ऐवज लंपास

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:30PMविटा  : वार्ताहर

येथील भरवस्तीतील सार्थक बंगल्याच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी 19 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही  घटना  शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी 42 तोळे सोने, 13 किलो चांदी आणि अडीच लाख रुपयांवर डल्‍ला मारला. याबाबत विटा पोलिसांत अमित प्रकाश शहा (रा. महावीरनगर, विटा) यांनी फिर्याद दिली आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  ः उद्योजक अमित शहा येथील महावीरनगर परिसरात सार्थक बंगल्यात राहतात. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अमित यांचे वडील प्रकाश शहा हे बाहेर फिरण्यासाठी गेले होते. बराच वेळ ते आले नसल्याने अमित यांनी त्यांना फोन करून ‘बाहेर पावसाचे वातावरण दिसते आहे. तुम्ही घरी या’, असे सांगितले. 

ते दीड वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. शनिवारी सकाळी अमित यांना त्यांची मुलगी माही हिने झोपेतून उठवले आणि ‘खाली काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला दादाजी बोलवत आहेत’ असे सांगितले. ते खाली गेले तेव्हा आजी सरला यांच्या खोलीच्या बाहेरील खिडकीचे ग्रील तोडल्याचे त्यांना दिसले तसेच खिडकी उघडी दिसली.

या खिडकीतून आत पाहिले असता बेडरुममध्ये कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. तसेच बेडरुमला आतून कडी लावल्याचे दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर अमित यांनी तत्काळ पोलिसांना या चोरीची माहिती दिली. 

घटनास्थळी पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, उपनिरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह पोलिस पथक हजर झाले. त्यांनी खिडकीतून बेडरुममध्ये प्रवेश करून कडी उघडली. प्रकाश शहा आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेडरुममध्ये प्रवेश केला तेव्हा  त्यांना एक लोखंडी कपाट आणि दोन लाकडी कपाटे उघडी असल्याचे दिसले. त्यातील साहित्य रुममध्ये विस्कटले होते. तसेच कपाटांची कुलुपे कटावणीने तोडली होती. 

चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच 9 लाख 45 हजार रुपये किंमतीची 35 ग्रॅमची सोन्याची लगड,5 ग्रॅमच्या तीन आणि 7 ग्रॅमची एक अशा सोन्याच्या चार अंगठ्या, 1 लाखाचे 40 गॅ्रमचे सोन्याचे दागिने असे एकूण 42 तोळे सोने लंपास केले आहे. पावणेदोन लाखांची 5 किलो चांदीची  लगड ,एक लाखांची तीन किलो चांदीची भांडी,एक किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती,2 किलो 600 ग्रॅमच्या चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल पळवला आहे. एक  किलो वजनाची 200 शिवकालीन चांदीची नाणीही चोरट्यांनी लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

शहा यांचा सार्थक बंगला फोडल्याची वार्ता शहरभर पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.  श्‍वान  बंगल्याच्या पाठीमागील बाजूने जाऊन क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून पुढे जात मॉडर्न हायस्कूल परिसरात घुटमळले. 

चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरुन बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. तसेच पाठीमागील असलेल्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केल्याने घरात कुणालाही रात्री चोरी झाल्याचा मागमूसही लागला नाही. 

तीन दुचाकीही पळवल्या

शहा यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर रस्त्यावर असलेल्या एका मेडिकल स्टोअरपासून पहाटे तीन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे.त्यामुळे  लवकरच आम्ही चोरट्यांपर्यंत पोहोचू असा विश्‍वास निरीक्षक  पिसाळ यांनी व्यक्त केला. तसेच बंगल्याबाहेर पडलेला एक नवा शर्ट पोलिसांना सापडला आहे. 

चौकशीसाठी कामगार ताब्यात

घटनास्थळी चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले आहेत. तसेच शहा यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी घराचे नुतनीकरण केले होते. त्या  कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास निरीक्षक पिसाळ करीत आहेत.