Fri, Apr 26, 2019 15:35होमपेज › Sangli › सुभाषनगरमध्ये दोन ठिकाणी चोरी

सुभाषनगरमध्ये दोन ठिकाणी चोरी

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:17PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

मिरजेपासून नजिक असलेल्या सुभाषनगर येथे चोरट्यांनी एक बंद बंगला फोडून 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एक औषध दुकान फोडून 3 हजार रूपये लंपास केले. अन्य दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. त्यामुळे सुभाषनगर परिसरात भीतीचे वातावरण  आहे. 

दोन ठिकाणी चोर्‍या झाल्या आहेत. पण एकाच ठिकाणच्या चोरीची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत महेश बाळासाहेब शितोळे (वय 24, रा. जलाराम मंदिराजवळ, सुभाषनगर) यांनी तक्रार दिली आहे. 

महेश हे मिरज एसटी आगारमध्ये कर्मचारी आहेत. ते घराला कुलूप लावून मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कामावर गेले होते. बुधवारी सकाळी ते साडे सात वाजण्याच्या सुमारास घरी परतले  तेव्हा घराचा कडी कोयंडा उचकटलेला  होता. घरातील कपाटही फोडलेले होते.  कपाटातील 20 हजार रूपयांची रोकड व 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरट्याने लंपास केली आहे. 

चोरट्यांनी कदम यांचे औषध दुकानही फोडले आहे. तेथून 3 हजार रूपये लंपास झाले आहेत. शितोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्य कोणीही तक्रार दिलेली नाही.

चोरटे पळाले...

सुभाषनगरमध्ये सय्यद यांचे टेलरिंगचे दुकान आहे. तेथे चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सय्यद जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर चोरटे जोशी यांच्या घराजवळ आले. ते घरात शिरले. पण जोशीही जागे झाल्याने चोरटे पळाले. चोरट्यांनी जाता- जाता नागरिकांवर दगडफेकही केली.