Thu, Aug 22, 2019 04:24होमपेज › Sangli › युवकाला लुटणार्‍यास अटक 

युवकाला लुटणार्‍यास अटक 

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 11 2018 1:08AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कॉलेज कॉर्नर येथून बिसूरला जाण्यासाठी मोटारसायकलवरून लिफ्ट देऊन माधवनगर येथील कॉटन मिल परिसरात नेऊन एका युवकाला लुटल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. लखन बाळू वारे (वय 29, रा. शांतीनगर, खणभाग) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 ग्रॅमची सोन्याची चेन, मोटारसायकल (एमएच 10 बीएन 5467) जप्त करण्यात आली आहे. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली.  

याप्रकरणी विकास बाळासाहेब पाटील (वय 30, रा. शरदनगर, पुणे, मूळ रा. बिसूर) याने फिर्याद दिली होती. विकास मूळचा बिसूरचा आहे. तो सध्या पुण्यात नोकरी करतो. सोमवार दि. 4 रोजी पहाटे तो पुण्याहून बिसूरला जाण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे आला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने मोटारसायकलवरून जाणार्‍या लखनकडे लिफ्ट मागितली. लखनने त्याला गाडीवर बसवून घेतले. दोघेही बिसूरच्या दिशेने निघाले असता माधवनगरमध्ये आल्यानंतर लखनने मोटारसायकल थेट कॉटन मिल परिसरातील निर्जन ठिकाणी नेली. तेथे गेल्यानंतर त्याने दगड उचलून विकासला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडील 13 ग्रॅमची सोन्याची चेन काढून घेतली. विकासला तेथेच सोडून तो मोटारसायकलवरून निघून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून लखनला अटक केली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील, हवालदार दिनेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संशयित रेकॉर्डवरचा गुन्हेगार

यातील संशयित लखन वारे पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी लुटमारीचे गुन्हे दाखल होते. सध्या त्याच्यावर मारामारीचाही गुन्हा दाखल आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडला संशयित...

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील 70 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लुटीची घटना घडलेल्या दिवशी आमराई तसेच माधवनगर बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संजयनगरचे हवालदार दिनेश माने यांनी तपासले होते. त्यावेळी त्यांचा लखनवर संशय बळावला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. या सीसीटीव्ही फुटेजसह हवालदार माने यांच्या सतर्कतेने संशयिताला पकडणे शक्य झाले.