Sun, Mar 24, 2019 04:36होमपेज › Sangli › सांगली, मिरजेतील ‘घरकुल’ची कामे निकृष्ट

सांगली, मिरजेतील ‘घरकुल’ची कामे निकृष्ट

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:15AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट आहे, यावर आता महापालिका प्रशासनानेच शिक्‍कामोर्तब केले आहे. त्यासंदर्भातील स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवालही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे सादर झाला आहे. 

याप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून ही कामे सुधारण्याचे आदेश त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय घरकुलांचे वाटप करू नये, असेही त्यांनी बजावले आहे. त्यामुळे या कामातील बोगसगिरी चव्हाट्यावर आली आहे.

झोपडपट्टीमुक्‍त शहर योजनेंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत आठपेक्षा अधिक ठिकाणी 2010 मध्ये घरकुल योजना मंजूर झाली होती. त्यासाठी केंद्र शासनाने 95 कोटी रुपये निधी दिला होता. परंतु त्याच्या सर्व्हेक्षण आराखड्यापासूनच वादाची झालर लागली होती. याप्रकरणी त्यावेळच्या विशेष लेखापरीक्षणातही ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत केवळ सांगलीतील बालहनुमान घरकुल योजनेची दोन घरकुले वगळता अन्य कोणतीही कामे पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी घरकुल योजनाच रद्दही केली आहे.

दरम्यान या योजनेची कामे अद्यापही संथगतीने सुरू असून, घरकुलाच्या आशेने अद्यापही झोपडपट्टीधारक रस्त्यावर राहिलेले आहेत. मोर्चा, आंदोलन सुरूच आहे.एकूणच या घरकुल योजनेबाबत उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते आदिंनी घरकुल योजनेचा पंचनामा केला होता. ही कामे निकृष्ट असल्याबद्दल राज्य शासनाकडे तक्रार केली होती. त्यासाठी गृहनिर्माण मंत्री  वायकर यांना सांगली दौर्‍यावर येण्यास सांगितले होते. ना. वायकर यांनी सांगलीतील बालहनुमान, धोत्रेआबा झोपडपट्टी, मिरजेतील इंदिरा गांधी झोपडपट्टी घरकु योजनेच्या कामांना भेटी देऊन झाडाझडती घेतली. त्यांनी ही घरकुलांची कामे राज्यात सर्वाधिक बोगस असल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात महापालिका आयुक्‍तांना स्ट्रक्‍चरल ऑडिट करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी मंगळवारी तो अहवाल ना.वायकर यांना सादर केला. यासंदर्भात खेबुडकर म्हणाले, अहवालानुसार स्टिल डिझाईन चांगले आहे. परंतु सर्वच घरकुलांच्या काँक्रिटीकरणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही घरकुले धोकादायक बनू शकतात. त्यासाठी ही सर्व कामे दुरुस्त करण्याच्या सक्‍त सुचना ना. वायकर यांनी दिल्या आहेत. ती दुरुस्त केल्याशिवाय त्याचे वाटप करू नये, असेही सक्‍त बजावले आहे. त्यामुळे आता मिरजेच्या घरकुलांचे वाटप लांबणीवर जाणार आहे.