Fri, Jul 19, 2019 23:19होमपेज › Sangli › ‘पाणीपुरवठा’ची महापौरांकडून झाडाझडती

‘पाणीपुरवठा’ची महापौरांकडून झाडाझडती

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:19AMसांगली : प्रतिनिधी

शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा ठणठणाट सुरू होता. याची गंभीर दखल घेत महापौर हारुण शिकलगार यांनी सोमवारी हिराबाग वॉटरवर्क्स कार्यालय गाठले. तेथे जाऊन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. नदीत पाणी असूनही शहरात ठणठणाट होता. याबद्दल तक्रारी करूनही अधिकारी, कर्मचार्‍यांचे फोन बंद असल्याबद्दल त्यांनी खडसावले. हा कारभार सुधारा, अन्यथा घरी बसवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिकलगार म्हणाले, शहरात एकीकडे 56 व 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंदे नूतनीकरण करून पुरवठ्यात सुधारणा केली आहे. पाणीपुरवठ्याची यंत्रणाही सक्षम केली आहे. असे असताना निव्वळ वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे गेल्या आठवड्यात शहरात पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा वाजले होते. अनेक भागात तर दोन-तीन दिवस पाणी पोहोचले नाही. वास्तविक नदीत पाणी असूनही अशी वेळ आली ही गंभीर बाब आहे. 

ते म्हणाले, अपुर्‍या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. नगरसेवक, पदाधिकार्‍यांनीही यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना फोन केले. परंतु अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. गावभाग, शामरावनगर, रामकृष्ण सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनीसह अनेक ठिकाणी पाणीपुरवठा ठप्प होता. वास्तविक याची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे होते. असे असूनही जर याचे गांभीर्य नसेल तर अशी कुचकामी यंत्रणा काय कामाची? यापुढे असा प्रकार घडला तर संबंधितांना घरी घालवू. श्री. उपाध्ये यांनी यंत्रणेकडून होत असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. ते म्हणाले. लवकरात लवकर नव्या मोटारी बसविल्यानंतर हा प्रश्‍न सुटेल, असे सांगितले. 

लवकरच 70 एमएलडीचे लोकार्पण

शिकलगार म्हणाले, पलूस-कडेगाव  मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानुसार आचारसंहिता शिथील होताच महापालिकेच्या 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करू. हे महापालिकेच्यादृष्टीने मोठे यश आहे. यासाठी आणखी अडीचशे एचपीच्या दोन मोटारी बसविल्यानंतर शहराचा पाणीप्रश्‍न कायम निकाली निघेल.