Sat, Jul 20, 2019 13:11होमपेज › Sangli › हॉटेल रत्नाच्या मालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

हॉटेल रत्नाच्या मालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 9:59PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना रात्री अकरानंतरही हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्सच्या मालकावर आचारसंहिता भंगाचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निरीक्षक आनंद पवार यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार हॉटेल मालक कमलाबाई कल्लप्पा कुमसगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मंगळवार दि. 17 रोजी रात्री 11.30 च्या दरम्यान हॉटेल रत्ना डीलक्स, कुपवाड या ठिकाणी वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा धारदार हत्याराने अकरा वार करून खून करण्यात आला होता.  ही घटना गंभीर स्वरूपाची असून, मतदारांमध्ये भीती निर्माण होवून त्याचा मतदान प्रक्रियेवर विपरित परिणाम होवू शकतो.

घटनेच्या वेळी हॉटेल रत्ना डीलक्समध्ये काही मद्यपी मद्यप्राशन करत होते व हॉटेलमालकाकडून मद्यविक्री होत होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत हॉटेल रात्री 11 नंतर चालू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा हॉटेलमालकावर दाखल करण्यासाठी  राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी प्राधिकृत केले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निरीक्षक आनंद पवार यांनी हॉटेल मालकाविरूद्ध शुक्रवारी फिर्याद दिली आहे.