Wed, May 22, 2019 17:12होमपेज › Sangli › शामरावनगरचे वाटोळे करणार्‍यांना थारा नको

शामरावनगरचे वाटोळे करणार्‍यांना थारा नको

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:03AMसांगली : प्रतिनिधी

केंद्र, राज्य आणि महापालिकेची वर्षानुवर्षे सत्ता असताना काँग्रेसने 40 वर्षे शामरावनगरला दलदलीत आणि  दूरवस्थेत लोटले, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. येथील शामरावनगरात जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, संजयनगर येथेही मागासवर्गीय समाजाचा मेळावा झाला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने दलित, मुस्लिमांना फसवले. मतांपुरते वापरले, असा आरोप त्यांनी केला. आज हा समाज भाजपसोबत येऊन उघडपणे बोलत आहे, असे ते म्हणाले. यामुळे महापालिका निवडणूक आम्ही जिंको न जिंको. यातच आम्ही जिंकलो याचे सर्वाधिक समाधान आहे, असे ते म्हणाले.

ना.पाटील म्हणाले, शामरावनगर हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे. या भागातून वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्येही जनतेने त्या पक्षांना साथ दिली. परंतु या भागात साध्या ड्रेनेज, रस्ते, पाण्यासारख्या सुविधा देण्यात आल्या नाहीत. पण आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार  या भागात आले. त्यांनी मला पावसाळ्यात झालेली दुरवस्था सांगितली. त्यांनी अवघ्या चार-आठ दिवसांत संपूर्ण रस्ते मुरुमीकरण करून चकाचक केले. आचारसंहिता असली तरी अत्यावश्यक सेवा देण्यात अडचण काय? त्यामुळे आता महापालिकेची सत्ता आमच्याकडे द्या. या भागाचे सोने करू.

खासदार संजय पाटील म्हणाले,  शामरावनगरासारख्या भागाला भाजपनेच अवघ्या आठ दिवसांत न्याय दिला आहे. भाजपला सत्ता द्या, सर्वोत्तम सुविधा येथे देऊ.आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, ज्या शामरावनगात पाय ठेवायला जागा नव्हती तेथे आज पावसाळ्यातही लोक आनंदाने ये-जा करीत आहेत. जे केले ते राजकारण म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून. आता अवघे 30 टक्के काम झाले आहे. महापालिकेची सत्ता हाती द्या, वर्षभरात उर्वरित 100 टक्के सुविधा देण्याची हमी मी देतो.प्रास्ताविक शरद नलावडे यांनी केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, मुन्ना कुरणे, रज्जाक नाईक, सुब्राव मद्रासी, शिवाजीराव सगरे,  श्रीकांत शिंदे, संजय परमणे, जितेंद्र मुळे उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून बुद्धीभेद

संजयनगरात मागासवर्गीय समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरेगाव- भीमा येथे झालेली दंगल भाजपने घडविली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे असा बुध्दिभेद करण्याचा प्रयत्न काँगेस, राष्ट्रवादीकडून सुरू आहे.   सुधीर गाडगीळ, आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची भाषणे झाली.