Sun, Jul 21, 2019 09:49होमपेज › Sangli › आघाडी विरुद्ध भाजप सरळ सामना

आघाडी विरुद्ध भाजप सरळ सामना

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्षांतील सुमारे 1000 हून अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. फोडाफोडी, इच्छुकांची नाराजी, प्रसंगी उमेदवार पळवापळवी होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी कमालीची दक्षता घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीने तर दुपारी पावणेतीन वाजता एबी फॉर्म देत आघाडीचे 78, भाजपने 78,  शिवसेना 51 आणि सुधार समितीने 19 उमेदवार जाहीर केले. स्वाभिमानी विकास आघाडीनेही 8 उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये विद्यमान तीसपेक्षा अधिक नगरसेवकांचे पत्ते कापले आहेत. आता आघाडी विरुद्ध भाजप, असा सरळ सामना रंगणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होती. पहिल्यांदाच भाजप-शिवसेना स्व:बळावर ताकदीने मैदानात उतरत आहेत. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला होता; परंतु जागावाटपासाठी गेले दोन महिने खल चालविला होता. अखेर काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 29 जागा अशी तडजोड झाली. सांगलीवाडीत प्रभाग 13 मध्ये तसेच मिरजेत प्रभाग 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला. भाजपनेही मुलाखती घेऊन 78 जागांसाठी स्वतंत्र यादी तयार ठेवली होती. आघाडीचा फैसला अगदी शेवटच्या क्षणी पावणेतीन वाजता झाल्याने भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीतून फोडाफोडीची फारशी संधी मिळाली नाही. बंडखोर कोणी गळाला लागले नाहीत.

तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय समिती सभापती सौ. स्नेहल सावंत, नगरसेवक महेंद्र सावंत,नगरसेविका अनारकली कुरणे, मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती शिंदे असे प्रबळ दावेदार भाजपकडे आले. यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक सुरेश आवटींचे पुत्र संदीप आवटी, निरंजन आवटी आदींसह नव्या-जुन्यांना संधी दिली.   मात्र शहर जिल्हा सरचिटणीस शरद नलावडे आदींसह अनेकांच्या उमदेवारीला कात्री लागली.

शिवसेनेनेही मोर्चेबांधणी केली होती. परंतु शिवसेनेला सर्व प्रभागात उमेदवार मिळाले नाहीत. काही ठिकाणी सोयीस्कर भूमिका घेण्यात आल्या. अखेर  51 उमेदवार जाहीर करण्यात आले.संभाजी पवार यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने काही ठिकाणी शिवसेनेसोबत तर काही ठिकाणी स्वतंत्र अशी भूमिका घेतली.  गावभागात प्रभाग 14 मध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करीत चारजणांचे पॅनेल उभे केले. काँग्रेसचे उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह चौघांना प्रभाग 1 मधून स्वाभिमानीच्या पॅनेलमधून उतरविण्यात आले.

सांगली जिल्हा सुधार समितीनेही 19 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.यामध्ये पक्षाचे कार्यवाह अ‍ॅड. अमित शिंदे यांच्या पत्नी सौ. अरुणा शिंदे, तानाजी रुईकर, सचिन चोपडे, रविंद्र काळोखे आदींचा समावेश आहे. डाव्या आघाडीनेही काही उमेदवार मैदानात उतरविले आहेत. सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक होते. परंतु यामध्ये प्रत्येक पक्षाने काही जणांना उमेदवारी देताना नाराज केले. अशा नाराजांनी आपले अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवले.  काहीजणांनी अपक्षांचे पॅनेलही उभे केले. प्रभाग 9 मधून मदनभाऊ पाटील गटाचे निष्ठावंत अतुल माने, बंडू सरगर यांनीही अन्य दोघा अपक्षांच्या मदतीने पॅनेल केले  आहे. 

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाडमधील  निवडणूक कार्यालयात  झुंबड उडाली होती. ऑनलाईन भरलेल्या अर्जांची प्रत   एबी फॉर्मसह जमा करायची होती. परंतु सर्वच पक्षांनी दुपारी पावणेतीननंतरच एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंत्रणेचीही तारांबळ उडाली. सर्वपक्षांच्या पदाधिकार्‍यांनी ज्या-त्या कक्षांमध्ये एबी फॉर्म जमा केले. पण त्यासाठी विलंब लागला. त्यामुळे तीन वाजण्यापूर्वी कार्यालयाच्या कक्षामध्ये जे उपस्थित होते त्यांचेच एबी फॉर्म जमा करून घेण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

आजी-माजी नगरसेवकांची दांडी उडाली

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने  गेल्या दोन महिन्यांपासून शहरात उमेदवारांबाबत चाचपणी सुरू ठेवली होती. दुसरीकडे, इच्छुकांची संख्याही मोठी होती. काँगेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. एकूण 78 पैकी काही जागांवर आरक्षणामुळे विद्यमान सदस्यांची संधी हुकली होती. त्यातच तुल्यबळ पॅनेल करताना आणि आघाडीच्या जागावाटपात एकाच प्रभागात आलेल्या  काँग्रेसच्या विद्यमान सदस्यांमध्ये रस्सीखेच झाली. त्यातून उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक राजेश नाईक, अनारकली कुरणे, किशोर लाटणे, सौ. वंदना कदम, पांडुरंग भिसे आदींसह 40 जणांची  दांडी उडाली.