Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Sangli › ‘स्थायी’चे अंदाजपत्रक आज महासभेकडे

‘स्थायी’चे अंदाजपत्रक आज महासभेकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली ; प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आश्‍वासनांचा वर्षाव करणारे  2018-19 साठीचे स्थायी समितीचे अंदाजपत्रक आता निश्‍चित झाले आहे. शनिवारी (दि. 31) सकाळी 11.30 वाजता अंदाजपत्रकीय महासभेत ते सादर होणार आहे. स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते हे अंदाजपत्रक महापौर हारुण शिकलगार यांच्याकडे सादर करणार आहेत. प्रशासनाने सादर केलेल्या 629 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 43 कोटी रुपयांची वाढ करून ते 673 कोटींवर नेले आहे.

प्रशासनाकडून डिसेंबरअखेर ते जानेवारीत अंदाजपत्रक देण्याची परंपरा होती. परंतु यावेळी मात्र तब्बल तीन महिने विलंबाने मार्चमध्ये प्रशासनाचे अंदाजपत्रक निश्‍चित झाले. 629 कोटी 22 लाखांचा तर 49 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी स्थायी समितीकडे सुपूर्द केले होते. यामध्ये जमेच्या बाजूत मिरज शहर सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी (अमृत योजना) 55 कोटी अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. महसुली जमा रकमेत सर्वाधिक 182 कोटींची अपेक्षित रक्कम एलबीटीतून गृहित धरण्यात आली आहे. जुन्या योजनांवरच निव्वळ शासन अनुदाच्या टेकूवर हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यामध्ये नवीन कोणत्याही योजनांचा यामध्ये समावेश नव्हता. सभापती सातपुते यांच्यासह समितीसह सदस्यांनी यामध्ये काही बदल केले. 

महापालिकेच्या निवडणूक तीन महिन्यावर आली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांसह काही महत्वाच्या सदस्यांची बायनेमची कामे यात समाविष्ट करण्यात आली. तसेच सांगली व मिरजेसाठी अत्याधुनिक भाजी मंडई उभारणीसाठी भरीव तरतूद केली आहे. यासह इतर काही नव्या योजनांचा समावेश करण्यात आला.  यामुळे प्रशासनाच्या अंदाजपत्रकात तब्बल 43 कोटींची वाढ झाली आहे. स्थायी समितीचा वार्षिक अंदाज 676 कोटींच्या घरात गेला आहे. ते अंदाजपत्रक श्री. सातपुते हे मार्चअखेरची मर्यादा पाळत आज महासभेकडे सादर करतील. साहजिकच महापौर शिकलगार हे या अंदाजपत्रकात सुधारणेसाठी काही दिवस घेणार, हे स्पष्ट आहे. त्यानंतर सदस्यांच्या सूचनेनुसार यात भरीव वाढ होऊन ते पुन्हा 700 कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.

Tags : Sangli, Sangli News, standing committees, budget, fixed


  •