होमपेज › Sangli › रिव्हॉल्व्हरच्या धाकाने वृद्धेला लुटले

रिव्हॉल्व्हरच्या धाकाने वृद्धेला लुटले

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 11:22PMकुरळप : वार्ताहर

कुरळप (ता. वाळवा) येथे तीन ते चार चोरट्यांनी मध्यरात्री घरात घुसून वृद्धेचे हातपाय बांधून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सहा तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुशीला आनंदा कांबळे (वय 70) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.येथील कुरळप फाट्यालगत सुशीला कांबळे या गेली 25 वर्षे  एकट्याच राहतात. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर त्यांचे घर आहे. बुधवारी (दि.16) मध्यरात्री त्यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा कुणीतरी ठोठावत असल्याचे त्यांना ऐकू आले.

मागील बाजूस एक लाकडी दार आहे आणि त्याबाहेर लोखंडी दरवाजा आहे. लाकडी दरवाजा उघडताच चोर आल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यांनी ओरडतच घराच्या पुढचा दरवाजा उघडला व हाका मारायला सुरुवात केली. मात्र चोरटे समोरच्याच दाराने घरात घुसले. त्यांनी कांबळे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रिव्हॉल्व्हर, चाकू व लोखंडी गज यांचा धाक दाखवत घरात फरपटत नेले.वृद्धेचे दोन्ही हात-पाय बांधले.मारहाण केली.  चोरट्यांनी कपाटात असणारे कपडे अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यांचे सर्व दागिने काढून घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी चार तोळ्यांच्या पाटल्या,  चेन, दोन अंगठ्या असे 1 लाख 38  हजार 500  रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. सकाळपर्यंत सुशिला कांबळे यांनी  कशीबशी सुटका करून घेतली आणि  शेजार्‍यांना चोरीबाबत कल्पना दिली. याप्रकरणी कुरळप  पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे 

घटनास्थळी श्‍वानपथक...

चोरीच्या घटनेनंतर चोरांचा माग काढण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण केले होते. यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर श्‍वान घुटमळले.