होमपेज › Sangli › आचारसंहितेचा बडगा : शहरातील ३०० कोटींची विकासकामे होणार ठप्प

आचारसंहितेचा बडगा : शहरातील ३०० कोटींची विकासकामे होणार ठप्प

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:56PMसांगली :  प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने सांगली, मिरज व कुपवाड शहरातील सुमारे 300 कोटींची कामे ठप्प झाली आहेत. यामध्ये मागासवर्गीय समितीच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या साठेआठ कोटी रुपयांच्या विकास कामांनाही आता ब्रेक लागला आहे. 

महापालिका निवडणुकीपूर्वीच 13 मेपासून स्थानिक विकास निधीच्या सर्वच कामांना शासन निकषानुसार आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी मनाई केली होती. परंतु शासकीय निधीसह विविध निधीतून विकासकामांचा धडाका सुरू होता. 

आता महापलिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. त्यानुसार विविध निधीतून मंजूर असलेली व दरमान्यातेने रखडलेल्या विविध कामांना थांबविण्याचे आदेश श्री. खेबुडकर यांनी दिले. यामध्ये वर्कऑर्डर दिल्यानंतरही प्रत्यक्षात सुरू न झालेल्या कामांचा समावेश आहे. यामुळे  सुमारे 200 कोटींची विकास कामे आता निवडणूक पार पडेपर्यंत ठप्प होणार आहे. 

निवडणूक कक्ष स्थापन

महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयात निवडणूक कक्षाची स्थापना सोमवारी करण्यात आली. नगरसेचिव के. सी. हळींगळे यांची कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महपाालिकेतील गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत सर्व विभागात समन्वय साधण्याचे काम या कक्षाकडे असणार आहे. चार लिपीक, चार शिपाई येथे नेमण्यात आले आहेत.