Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Sangli › गावपण हटेना; समस्या सुटेनात

गावपण हटेना; समस्या सुटेनात

Published On: May 24 2018 1:23AM | Last Updated: May 23 2018 7:22PMसांगली : प्रतिनिधी

तत्कालीन नगरपालिकेपासून ते महापालिकेत  सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांबरोबर फरफटत जात असलेल्या  सांगलीवाडीची विकासात  उपेक्षाच होत आली आहे. जिल्ह्यातील अनेक खेडी सुधारली. पण गेल्या 30-40 वर्षांत शहरात असूनही पाणी, ड्रेनेज, आरोग्य, साफसफाई, रस्ते आदी समस्या आजही आ-वासून उभ्या आहेत. अन्य उद्याने, उद्योग-धंद्यांसह सुविधांचा तर विचारच इथपर्यंत पोहोचला नाही.

शहराच्या विस्तारानुसार कदमवाडी, वाटेगावकर मळा, सुतार मळा, गावडे मळा, साईनगर, बाळेकुंद्रीनगर, राहुल पाटीलनगर जोशी प्लॉट आदी वाड्यांवर वस्त्या वाढत गेल्या. त्यामुळे तेथे रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधा पोहोचविणे महापालिकेचे कर्तव्य होते. पण दुर्दैवाने त्यात महापालिका आणि कारभार्‍यांना यश आलेले नाही. गेल्या काही वर्षांत पाण्याची समस्या नवीन टाकी उभारल्याने थोडीफार कमी झाली आहे.

पण ड्रेनेजचा प्रश्‍न गंभीर आहे. मोठा पाऊस झाला किंवा सकाळी सांडपाणी गावातून बाहेर पडताना गावाच्या मुख्य सांगली बँक चौकात तुंबते. त्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. महापालिकेने हे सर्व सांडपाणी मलनि:स्सारण केंद्र उभारून हटविण्याचा कागदोपत्री प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण अद्याप जागा निश्‍चितीसह मुहूर्त लागलेला नाही. उपनगरात काही ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या, पण त्या अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीत.

शहर असो वा उपनगरात रस्त्यावर कचराकुंड्या ठाण मांडून आहेत. त्या भरून वाहात असल्या तरी हटविल्या जात नाहीत, अशा तक्रारी आहेत. औषध फवारणीही अनियमित होते. वाढत्या शहरीकरणानुसार रस्ते रुंदीकरण, रस्ते नियोजनाचा इथे पत्ताच नाही. त्यामुळे अस्ताव्यस्त वाहने रस्त्यांची कोंडी करीत ठाण मांडलेली असतात. अनेक खेडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बदलली, शहरालाही मागे टाकू लागली. पण पूल ओलांडला की समस्यांच्या गर्तेत अडकलेली सांगलीवाडी डोळे झाकून ओळखली जाते. यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने याचा पुन्हा जनतेतून पंचनामा होऊ लागला आहे. उमेदवार, पक्ष कोणताही असो हे चित्र बदलण्याची हमी नव्हे तर ठाम विश्‍वास देणारे उमेदवार हवेत, असा सूर व्यक्त होत आहे.

समस्या प्रभागांच्या परिसर : सांगलीवाडी

मूळ गावठाण, कदमवाडी, जोतिबा मंदिर परिसर, साईनगर, जोशी प्लॉट, गाडगीळ प्लॉट, बाळेकुंद्रीनगर, गावडे मळा, सुतार प्लॉट, धरण रस्ता, मातंग समाज वस्ती आदी.