Tue, Mar 19, 2019 20:43होमपेज › Sangli › सत्तेची चावी ‘तरूणतुर्कांच्या’ हाती!

सत्तेची चावी ‘तरूणतुर्कांच्या’ हाती!

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 8:18PMसांगली : सुनील कदम

महापालिका क्षेत्रातील एकूण मतदारांपैकी जवळपास चाळीस टक्के मतदार हे ‘तरूणतुर्क’ या गटात मोडणारे आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची चावी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय प्रामुख्याने याच वर्गाच्या हातात असणार आहे. जो पक्ष किंवा गट  युवा मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, त्यांच्याकडे युवावर्ग झुकण्याची शक्यता आहे.महापालिका क्षेत्रात एकूण 4 लाख 24 हजार 179 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 15 हजार 547 पुरूष आणि 2 लाख 8 हजार 595 महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे एकूण मतदारांपैकी  40 टक्के म्हणजेच जवळपास 1 लाख 70 हजार मतदार हे 18 ते 35 या वयोगटातील आहेत. याचा अर्थ महापालिका निवडणुकीत युवावर्गाच्या हाती फार मोठे सामर्थ्य एकवटलेले आहे. ज्या पक्षाच्या किंवा ज्या गटाच्या पाठीमागे या युवावर्गाची ताकद उभी राहील, त्यांना निवडणूक सोपी जाण्याचे संकेत या निमित्ताने दिसत आहेत. या 1 लाख 70 हजार युवा मतदारांपैकी 85 हजार या युवती असणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील महिलांविषयक धोरणांनासुध्दा तेवढेच महत्व असणार आहे.

आजकाल महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आणि काही ठिकाणी प्रचाराच्या कामालासुध्दा वेग आला असला तरी ही युवापिढी निवडणुकीतील परंपरागत प्रचार पध्दतीपासून अलिप्त असलेली दिसत आहे. प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, प्रचाररॅली, कोपरासभा आदी प्रचाराच्या परंपरागत प्रकारांपासून ही युवापिढी लांब आहे. कारण या युवापिढीकडे प्रचाराचे स्वत:चे असे एक तंत्र आहे आणि ते म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक. या माध्यमातून आजकाल हा वर्ग मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभागी झालेला दिसत आहे. मात्र प्रचाराची ही यंत्रणा व्यक्तीकेंद्रीत किंवा गटकेंद्रीत असल्याने असल्या प्रचाराचे जाहीर प्रदर्शन होताना दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रात या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडालेला दिसत आहे.

पक्षनिहाय मतदारांचीसुध्दा एक वर्गवारी असते. ज्या पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार पटतील, अशा राजकीय पक्षांकडे मतदार आकर्षित होतो. अनेकवेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तेच तेच परंपरागत मतदार दिसून येतात. वर्षानुवर्षातील वेगवेगळ्या निवडणुकांचा आढावा घेता याचा प्रत्यय येतो. मात्र गेल्या काही वर्षात ‘परंपरागत मतदार’ ही संकल्पना जणूकाही मोडीत निघाल्याचे दिसत आहे आणि त्याला प्रामुख्याने नव किंवा युवा मतदार कारणीभूत ठरताना दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांची पक्षीय ध्येयधोरणे आणि विचारधारा यांच्याशी या युवामतदाराला फारसे देणेघेणे असलेले दिसत नाही. ‘मी...आज माझ्यापुढे असलेले प्रश्‍न आणि आणि त्याचे तातडीने हवे असलेले उत्तर’,  तो जो देईल तो माझा आणि माझे मत त्याला, असा या युवा मतदारांचा रोकठोक मामला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीतही युवा मतदार आपला प्रभाव दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आजकाल अनेक प्रभागांमध्ये अमिष-सामिष भोजनावळींचा कार्यक्रम सुरू असलेला दिसत आहे. आज या उमेदवाराच्या तर उद्या त्या उमेदवाराच्या भोजनावळी झडत आहेत. या भोजनावळींमध्ये प्रामुख्याने युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते आहे. ती विचारात घेता सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. एकूणच या पातळीवरील राजकीय हालचाली विचारात घेता महापालिकेतील सत्तेच्या चाव्या युवा मतदारांच्या हातात असलेल्या बघायला मिळत आहेत.

युवा मतदारांकडून अपेक्षा!

साधारणत: असे आढळून येते की, 18 ते 35 या वयोगटातील युवकांवर अपवाद वगळता अजून फार मोठी कौटुंबिक किंवा सामाजिक जबाबदारी पडलेली नसते. त्यांचे अवलंबित्व अजूनही पालकांवरच असते. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, राजकीय शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी अशासारखे सामाजिक प्रश्‍न असतील किंवा घरातील पाणीटंचाई, परिसरातील अस्वच्छता, भेडसावणार्‍या नागरी समस्या आदींची थेट झळ या वर्गाला अभावानेच जाणवते. त्यामुळे अनेकवेळा निवडणुकीत अशा मतदारांकडून एकूण परिस्थितीचा राजकीय अंगाने सांगोपांग विचार करण्याऐवजी प्रसंगपरत्वे मिळणारा फायदा विचारात घेवून मतदान केले जाते आणि नको त्या लोकांचे फावले जाते, अनेक निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे युवा मतदारांनी निवडणुकीत मिळणारे केवळ तत्कालीन फायदे विचारात घेण्याऐवजी दीर्घकालीन विचार करून मतदान करण्याची आवश्यकता आहे.

जाणत्यांनी जागण्याची गरज!

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या कारभाराचा लौकिक पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेला आहे. महापालिकेतील कारभाराचे आजपर्यंत इतके वाभाडे निघाले आहेत की, सांगता सोय नाही. महापालिकेतील या गैरव्यवहाराला अनेकवेळा वाचा फोडणारा, या गैरव्यवहाराबद्दल जाहीरपणे जाब विचारणारा, प्रसंगी त्याबद्दल शासन दरबारी न्याय मागणारा आणि सदासर्वदा महापालिकेच्या कारभाराबद्दल नाके मुरडणारा एक ठराविक वर्ग आहे आणि तो वर्ग म्हणजे महापालिका क्षेत्रातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, शिक्षक, प्राध्यापक  आणि पांढरपेशा वर्ग. अनेक अर्थाने समाजातील हा जाणता वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार मोठा अर्थ आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी काही सन्माननीय अपवाद वगळता हा ‘जाणता राजा’ गायब झालेला दिसतो आणि ‘कारभारी’ निवडण्याची जबाबदारी भलतेच लोक पार पाडून जातात. हे टाळायचे असेल तर या जाणत्यांनी मतदानादिवशी जागे राहण्याची गरज आहे.