Wed, Aug 21, 2019 19:49होमपेज › Sangli › महापालिका निवडणूक जुलैअखेर होण्याची शक्यता

महापालिका निवडणूक जुलैअखेर होण्याची शक्यता

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:33PMसांगली :  प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या दि. 5 जून रोजी जाहीर होणार आहेत. या यादीवर हरकती व सूचना होऊन मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यासाठी दि. 30 जूनची मुदत आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात आचारसंहिता व मतदान जुलैअखेर  होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. त्यामध्ये दि. 1 जानेवारी 18 पर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे नोंदणी करून दि. 21 मेपर्यंत अद्ययावत केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात येणार आहे.

या यादीसोबत दि. 10 जानेवारी ते दि. 21 मेपर्यंत झालेली नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्त मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडून प्राप्त करून घेऊन  महापालिकेने त्याचे प्रभागनिहाय विभाजन करायचे आहे. यानंतर दि. 5 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. या यादीवर दि. 5 ते दि. 14 जूनपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यावर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी दि. 27 जून रोजी जाहीर होणार आहे. मतदान केंद्रे व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 30 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. महापाालिका निवडणुकीसाठी 20 प्रभाग व 78 सदस्य संख्या आहे. प्रभाग रचना व आरक्षण अंतिम झाले आहे.त्यामुळे दि. 5 जूननंतरच  आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या दि. 14 जूनला अंतिम होणार आहे. त्यामुळे दि.14 जूननंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. 45 दिवसांचा आचारसंहिता कालावधी असेल. म्हणजेच जुलैच्या चौथ्या आठवड्यात मतदान व निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल.

 मतदार यादीचा कार्यक्रम 

 प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिद्धी- दि. 5 जून   प्रारूप यादीवर हरकतींसाठी मुदत - दि. 5 ते  दि.14 जून   अंतिम मतदार यादी प्रसिद्धी- दि.27 जून   मतदान केंद्रे व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धी -दि. 30 जून.