Sat, Apr 20, 2019 18:05होमपेज › Sangli › कापूसखेडमध्ये तरुणाचा खून 

कापूसखेडमध्ये तरुणाचा खून 

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 07 2018 12:06AMइस्लामपूर : वार्ताहर

ग्रामपंचायत निवडणूक व विहिरीच्या पाण्याच्या वादातून  वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे शुक्रवारी सागर शिवाजी मरळे  (वय 32) याचा कुर्‍हाडीने घाव घालून व दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला. यावेळी दोन कुटुंबात झालेल्या सशस्त्र मारामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी वाहनांचीही तोडफोड करून घरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर अज्ञातांकडून संशयितांचे घर पेटवून देण्याचा प्रकार घडला.   

ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी  इस्लामपूर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी खूनप्रकरणी नितीन दिलीप मोकाशी, अतुल दिलीप मोकाशी, दिलीप भीमराव मोकाशी, उज्ज्वला दिलीप  मोकाशी, सुषमा  नितीन मोकाशी व अनोळखी एक अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नितीन व अतुल या दोघा भावांना अटक केली आहे. 

तलवारीने वार करून पती पत्नीला गंभीर जखमी केल्याप्रकरणी सागर शिवाजी  मरळे, शिवाजी विठ्ठल मरळे, अशोक सहदेव कोळी, अमोल सहदेव कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळी बंधूना अटक करण्यात आली आहे.या मारामारीत उज्वला मोकाशी, दिलीप मोकाशी, नितीन मोकाशी, शिवाजी मरळे हे जखमी झाले आहेत. मोकाशी पती-पत्नीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा महिन्यापुर्वी विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून सागरचा भाऊ  सचिन व त्याचा मित्र अमोल कोळी यांनी अतुल यास मारहाण केली होती.त्यामुळे नितीन याने त्यांना कसण्यास दिलेली जमीन काढून घेतली होती. तेव्हा पासून या दोन्ही कुटूंबात तेढ निर्माण झाले होते.त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी दोन्ही कुटूंबे परस्पर विरोधात उभे ठाकल्यामुळे त्यांच्यातील वाद आणखी वाढला होता. 

सशस्त्र हल्‍ला

गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा सागर व नितीन यांच्यात रस्त्यावर  जोरदार वाद झाला. त्यावेळी सागरने नितीनच्या श्रीमुखात लगावली.त्यामुळे नितीन मोटरसायकल रस्त्यावर टाकून घरी गेला. त्यानंतर थोड्याच वेळात सागर, त्याचे वडिल शिवाजी, अशोक कोळी, अमोल कोळी  हे  हातात तलवारी घेऊ न नितीनच्या घरासमोर जाऊ न दगडफेक करू लागले. घरासमोर लावलेली इंडिका कार एम.एच.02 ए.के. 286, मोटरसायकल एम.एच.43 ए.क्यू. 3628 वर दगडफेक करून तोडफोड केली. 
यावेळी नितीन यानेही त्यांच्यावर दगडफेक केली. त्यावेळी सागरने तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत नितीनच्या आई, वडिलांवर हल्‍ला केला. या हल्ल्यात दिलीप मोकाशी यांच्या मानेवर व उज्वला यांच्या चेहर्‍यावर गंभीर वार झाले.  त्यानंतर नितीन याने घरातील कुर्‍हाड आणून  सागर याच्यावर हल्‍ला केला. त्यावेळी त्याच्या हातावर सागरने तलवारीने वार केला. त्यानंतर नितीन व त्याचा भाऊ  अतुल यांनी कुर्‍हाडीने सागरच्या हातावर व तोंडावर वार करत व दगडाने डोके ठेचून गंभीर जखमी केले. त्याच्या डोक्यावर खोलवर जखम झाली होती. यावेळी सागर याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. जखमी सागर याला उपचारासाठी इस्लामपूर येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

संशयितांचे घर पेटविले

दरम्यान,  खून प्रकरणानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिस ठाण्याकडे परत आल्यानंतर अज्ञातांनी संशयित मोकाशी बंधूंच्या घरावर हल्‍ला चढवला. घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील सर्व साहित्य पेटवून दिले. टीव्ही, तिजोरी, कपाटांची तोडफोड केली. तसेच घरातील सिलेंडरही पेटवून देण्याचा प्रयत्न केला.घरातून आगीच्या ज्वाला व धूर बाहेर येवू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाणी ओतून ही आग विझवली.सुदैवाने या आगीत सिलेंडर टाकीचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अज्ञातांनी घराला लावलेल्या आगीत घरातील कपडे, अंथरूण, बेड व इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले  होते. घरात सर्वत्र जळालेले साहित्य पडले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात कमालीचा तणाव आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

परस्परविरोधी फिर्यादी

याप्रकरणी सागरचे वडील शिवाजी विठ्ठल मरळे यांनी नितीन, अतुल, दिलीप, उज्वला, सुषमा अशा सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सागर हा मित्रांसमवेत शेतात चालला असता वाटेत अडवूण करून वरील सर्वांनी त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. तर सागर, शिवाजी मरळे, अमोल कोळी, अशोक कोळी यांनी तलवारीने आई, वडील व माझ्यावर खुनी हल्‍ला केल्याची फिर्याद नितीन याने दिली आहे.

दरम्यान, खुनाची घटना समजताच पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण, कोमल पवार, हवालदार हिंदूराव पाटील, कृष्णा पवार, गणेश कांबळे, संतोष देसाई, अमोल माळी, प्रशांत देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हात वापरलेली कुर्‍हाड, कोयता,  दगड ताब्यात घेतले.

निवडणूक व पाण्याचा वाद

मरळे व मोकाशी कुटुंबात शेतजमीन व विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा वाद आणखी  वाढत गेला. याच कारणांवरून दोन्ही कुटुंबात वारंवार भांडणे होत होती.  सागर मरळे व अतुल हे दोघे मित्र होते. सागरला शेतजमीन नसल्याने त्याच्या वडिलांना अतुलच्या भावाने गावातील भानुदास जाधव यांची 20 गुंठे जमीन कसण्यासाठी दिली होती. तसेच त्यांच्या स्वतःच्या विहिरीचे पाणीही दिले होते.

 

Tags : sangli, sangli news, Kapuskhed, crime, murder,