Sat, May 25, 2019 22:52होमपेज › Sangli › प्रेयसीच्या मुलीचा खून उघड

प्रेयसीच्या मुलीचा खून उघड

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:24AMसांगली : प्रतिनिधी

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या पाच वर्षीय मुलीचा बेदम मारहाणीत  मृत्यू झाला. पूर्वा संदीप काकडे (वय 5) असे तिचे नाव आहे.  सोमवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तब्बल चार दिवसांनी खुनाचा हा प्रकार सांगली शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोन्या ऊर्फ सोहम शामराव भोसले (वय 27, रा. दुसरी गल्ली, हनुमाननगर) असे अटक केलेल्या संशयित प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील संदीप संभाजी काकडे (वय 35, रा. माने प्लॉट, हरिपूर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप काकडे यांना चार मुली आहेत. संदीप आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाल्याने काही महिन्यांपासून ते विभक्‍त राहतात. संदीपची पत्नी चारही मुलींसोबत पाटणे प्लॉट परिसरात एक पत्र्याची खोली भाड्याने घेऊन राहते. 

ती मोलकरीण म्हणून काम करते तर संशयित सोन्या भोसले आचारी काम करतो. त्यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. सोन्या नेहमीच तिच्या घरी मुक्कामाला असायचा. दोन महिन्यांपूर्वी पूर्वा झोपत नसल्याने त्याने तिचा चावा घेतला होता. त्यावेळी प्रेयसी आणि सोन्या भोसले यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शेजार्‍यांनी ताकीद दिल्याने सोन्याने तिच्याकडे जाणे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी सोन्याने घडलेल्या प्रकाराबाबत तिची माफी मागितली होती. त्यानंतर त्याचे पुन्हा तिच्याकडे येणे-जाणे सुरू झाले होते. 

सोमवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास सोन्या प्रेयसीच्या घरी गेला होता. त्यावेळी तिला तिच्या भावाचा फोन आला. त्याने पैसे नेण्यासाठी तिला बोलावल्याने चारही मुलींना घरात ठेवून ती पैसे आणण्यासाठी भावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या चारही मुली आणि सोन्याच घरात होते. रात्री उशीर झाला तरी मुली झोपत नसल्याने त्याने तीन मुलींना चापट मारली होती. त्यानंतर तिघीही झोपी गेल्या. मात्र पूर्वाची हालचाल सुरू होती. पूर्वा झोपत नसल्याने त्याने तिला उठविले. तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर ती झोपी गेली. रात्री दहाच्या सुमारास ती घरी परतली. प्रेयसी सोन्यासोबत बोलत बसली असताना पूर्वा तिच्याजवळ गेली. त्यानंतर काही वेळाने ती बेशुद्ध पडली. नंतर तिने शेजार्‍यांच्या मदतीने तिला सिव्हील हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र वाटेतच पूर्वाचा मृत्यू झाला होता.

उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर शहर पोलिसांना पूर्वाच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. अहवालानुसार तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. पूर्वाची मोठी बहीण गौरी (वय 9) हिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने त्या रात्री सोन्या  याने तिला मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. Saपोलिसांनी प्रेयसी, तिचा पती संदीप यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संशयित सोन्या भोसलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.