Mon, Jun 24, 2019 21:31होमपेज › Sangli › नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड

नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:19AMतासगाव : शहर प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढून दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्याप नवीन अश्‍वारूढ पुतळा उभा केला नाही. सत्ताधार्‍यांकडून केवळ आश्‍वासने दिली जात आहेत, त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बुधवारी  अखेर नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनात घुसून तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांनी रौद्ररूप धारण करून येत्या जुलैअखेर छत्रपती  शिवाजी महाराजांचा पुतळा न उभारल्यास पालिका पेटवू, असा   इशारा दिला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन शासकीय मालमत्तेच्या नुकसानीप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

सन 2016 मध्ये पालिका निवडणुकीच्या कालावधीत  शहरात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन अश्वारूढ पुतळा उभारायचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. त्यावेळी जुना पुतळा काढून त्याठिकाणी नवीन पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या थाटात झाला होता. मात्र त्यानंतर पुतळ्याच्या कामात सातत्य राहिले नाही. जुना पुतळा अनेक दिवस पालिकेतील एका खोलीत अडगळीत पडून होता. शिवयंतीदिवशीही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली नाही. यावरुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्याचवेळी नवीन  पुतळा कधी बसवणार, असा जाबही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विचारला होता. त्यावेळी नगराध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  पालिका पदाधिकार्‍यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. मात्र तरीही पालिका पदाधिकार्‍यांना जाग आली नाही.त्यामुळे आज शिवराज्याभिषेकदिनी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर थेट पालिकेत धाव घेऊन नगराध्यक्ष  सावंत यांना नवीन पुतळा उभारणीबाबत जाब विचारला. मात्र सावंत यांनी आंदोलकांना  ‘काम सुरू आहे’, असे  उत्तर दिले. यातून संतापलेल्या शिवसैनिकांनी ठोस व लेखी आश्वासन मागितले. मात्र नगराध्यक्षांनी ‘ते शक्य नाही, उगाच मला कशात अडकवू नका’, असे उत्तर दिले.

त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी सावंत यांच्या दालनातील खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केली.काचा फोडल्या. दि.30 जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. 
हा सर्व प्रकार होत असताना एका नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनाचे दार बाहेरून बंद केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.   काही वेळाने पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. नगराध्यक्ष सावंत यांच्याकडून फिर्याद देण्याचे काम सुरू होते.