Sat, Jul 20, 2019 11:00होमपेज › Sangli › दूध आंदोलनाला लोकसभा निवडणुकीचा वास 

दूध आंदोलनाला लोकसभा निवडणुकीचा वास 

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:01PMइस्लामपूर : प्रतिनिधी

राज्याचे कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांना यश येऊन राज्यातील दूध प्रश्‍नावर सरकार तोडगा काढतंय, तज्ज्ञांच्या शिफारशी मान्य करून दूध उत्पादकांचं हित साधलं जातंय, असे लक्षात येताच काही मंडळींनी दूध आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला लोकसभा निवडणुकीचा वास आहे. शेतकर्‍यांचे हाल त्यांना सहा महिने का दिसले नाहीत? आम्ही प्रयत्न केल्यावर हे जागे का झाले, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केला आहे.

स्वत:च पांढर्‍या दुधातील काळे बोके बनलेल्या या नेत्यांनी स्वत:च्या संघात तरी शेतकर्‍यांना न्याय दर दिला का, असा प्रश्‍न भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जनतेने फार अपेक्षेने यांना लोकसभेत धाडले. तिथे यांनी दूध उत्पादकांचे मागणे मागितले नाही. दुधाचा प्रश्‍न हा जागतिक प्रश्‍न बनला आहे. जगात दूध भुकटीची मागणी घटली, दर घसरले. भारताच्या निर्यातीला मर्यादा आली. दूध भुकटीचे दर 250 वरुन  110 रुपये किलोवर आले. दूधप्रश्‍नी देशपातळीवर चिंता व्यक्त झाली. त्यात महाराष्ट्राचा आणि विशेषत: दूध पट्ट्यातला शेतकरी होरपळला.

शेतकर्‍यांचे हाल तेव्हा त्यांना दिसले नाहीत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्याकडे निर्यात अनुदानासाठी प्रयत्न करण्याचे गेल्याच महिन्यात साकडे घातले. प्रतिकिलो 50 रुपयेची मागणी केली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत केले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवून दूध उत्पादकांसाठी जे करायचे ते ठरविण्यास सांगितले. 
तज्ज्ञांनी निर्यातीला अनुदान, बटरवरील जीएसटी  12 वरुन 5 टक्के करणे तसेच शालेय पोषण आहारात दुधाचाही समावेश, अशा काही पर्यायांचा विचार चालला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात 

सकारात्मक निर्णय घेऊ, असा सकारात्मक इरादा व्यक्त केला आहे. याचा सुगावा लागल्यावर खरेतर सरकारला साथ देण्याचं धोरण कोणीही खुल्या मनानं स्वीकारलं असतं, पण ज्यांनी दिल्लीत शेतकर्‍यांची बाजू मांडली नाही. ते गल्लीत आंदोलन पेटवण्याचा स्टंट करत आहेत,  अशी टीका करून भोसले यांनी या सर्व प्रकाराला लोकसभा निवडणुकीचा वास आहे. आता आंदोलन करून शेतकर्‍यांचे अधिक हाल करू नये आणि शेतकर्‍यांनी अशा प्रवृत्तीला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.