Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Sangli › दूध आंदोलनाचा भडका; चक्काजाम

दूध आंदोलनाचा भडका; चक्काजाम

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 10:09PMसांगली : प्रतिनिधी

दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा गुरुवारी जिल्ह्यात भडका उडाला आहे. कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, तासगाव तालुक्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आला. आंदोलकांनी काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. पलूस तालुक्यात आंदोलनावेळी आंदोलक व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे झालेल्या रास्तारोकोवेळी गायीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. तासगाव तालुक्यातील आरवडे येथे एका डेअरीच्या गाडीतील 1500 लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले. 

शिरढोणला चक्काजाम

स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, किसान सभेच्यावतीने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी रस्त्यावर दूध ओतण्यात आले. तसेच गायीला अभिषेक घालून सरकारला सुबुद्धी दे, अशी मागणी करण्यात आली. स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, शिवसेनेचे दिनकर पाटील, मारुती पवार, संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे गणेश पाटील, दिग्विजय शिंदे, अभिजित पाटील, किसान सभेचे कॉ. दिगंबर कांबळे, गवस शिरोळकर, स्वाभिमानाचे सूरज पाटील, शिवाजी पाटील, शंकर लंगोटे, बोरगावचे सरपंच सहदेव परीट, उपसरपंच नामदेव पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील, मोहन खोत उपस्थित होते. तहसीलदार  नागेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

खानापूर तालुक्यात दूध आंदोलनाचे पडसाद

खानापूर तालुक्यातील बलवडी (भाळवणी) येथील फाट्यावर बलवडी आणि जाधवनगर येथील  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. आंदोलकांनी भिलवडी व कुंडलकडे जाणार्‍या गाड्या अडवून काही काळ रास्ता रोको केला. गाड्यातील दूध रस्त्यावर ओतल्यामुळे दूध आंदोलनाचे तालुक्यात पहिल्यांदाच पडसाद उमटले. 

कृष्णेत दूध ओतून आंदोलन

भिलवडी येथे आंदोलकांनी कृष्णा नदीत दूध ओतून सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. 

दुधगावात गाड्या अडवल्या

सावळवाडीहून  बागणी, आष्ट्याकडे  दोन दूध वाहतूक करणारे टेंपो निघाले होते. दुधगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  ते अडवून टेंपोमधील सर्व दूध शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना  वाटप केले. मात्र दुधाची नासाडी टाळली.

आरवडेत रास्तारोको

तासगाव तालुक्यातील आरवडे येथे आंदोलकांनी एका डेअरीची गाडी अडवून त्यातील 1500 लिटर दूध रस्त्यावर ओतले.  डेअरीची गाडी सावळज भागातील दूध संकलन करून आरवडेमार्गे भिलवडीकडे निघाली होती. याची माहिती मिळताच आंदोलकांनी ही गाडी आरवडे बसस्थानकावर अडवली व त्यामधील अंदाजे 1500 लिटर दूध रस्त्यावर ओतले. कडेगाव तालुक्यात दूध आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात चार दिवसापासून सुमारे आठ लाख लिटर दूध संकलन थांबले आहे. त्यामुळे अडीच कोटींचा फटका बसला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तालुक्यातील मोहिते वडगाव येथे रस्त्यावर जनावरे बांधून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

जत तालुक्यात आंदोलन

जत तालुक्यात  चौथ्या दिवशी पारे (ता. सांगोला) येथील दूध घेऊन जाणारा टेम्पो वायफळ (ता. जत) याठिकाणी  रोखला व यातील दूध रस्त्यावर  ओतले.

पेठ-सांगली रस्ता अडविला; टायर पेटविले

दूध दरवाढीसाठी वाळवा तालुक्यातही जोरदार आंदोलन करण्यात आले. पुणे - बेंगलोर महामार्गावर आंदोलकांनी गाड्या अडवून रास्तारोको करण्यात आला. लवंडमाची येथे रास्तारोको आंदोलन करून हुतात्मा दूध संघाचा टेम्पो अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. पोलिसांनी तालुक्यातील प्रमुख मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. किणी टोलनाका येथे महामार्ग रोको आंदोलन होणार असल्याने कणेगाव येथेच पोलिसांनी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तुजारपूर येथे दुधाचा अभिषेक घालण्यात आला. पेठ-सांगली रस्ताही टायर पेटवून काहीकाळ अडविण्यात आला.